Pune : महावितरणच्या कंत्राटी कामगारांचे आंदोलन ; शासनाविरोधात घोषणाबाजी करीत भरती अर्जाची केली होळी

Agitation of contract workers of MSEDCL; Holi of application for recruitment by shouting slogans against the government

एमपीसी न्यूज – महावितरणमधील कंत्राटी कामगारांना भरतीमध्ये प्राधान्य न देता भरती केल्यामुळे महावितरणच्या कंत्राटी कामगारांनी आज, गुरुवारी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येऊन महाराष्ट्र शासन आणि वीज कंपनी प्रशासनाचा जाहीर निषेध केला. या कंत्राटी कामगारांनी शासनाविरोधात आणि संबंधित मंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.तसेच भरती प्रक्रियेच्या फॉर्मची होळी करून निषेध व्यक्त केला.

महावितरण कंत्राटी कामगार संघटनेचे निलेश खरात, सचिन मेंगाळे, उमेश आणेराव, राहुल बोडके, सागर पवार, प्रवीण पवार, अर्जुन चव्हाण, उमेश विश्वाद सुमित कांबळे आदी या आंदोलनात सहभागी झाले होते. महावितरण कंपनीमध्ये असलेल्या रिक्त पदांच्या जागेवर वर्षानुवर्ष हजारो कंत्राटी कामगार काम करत असताना 7 हजार जागांची भरती उर्जामंत्र्यांनी 23 जून रोजी जाहीर केली.

शासनाच्या आदेशानुसार समान कामास समान वेतन न देता किमान वेतनावर या कामगारांना मागील 15 ते 20 वर्षे सोयीस्कर रित्या वापरून आता त्यांना नारळ देण्याची तयारी शासनाकडून केली जात आहे. ज्या कामगारांनी शासनाचे करोडो रुपये वाचवले, त्यांना या नोकर भरतीमध्ये विशेष बाब म्हणून प्राधान्य मिळावे, वयाची सवलत अथवा आरक्षण मिळावे, या संघटनेच्या आधी पासूनच्या मागण्या आहेत.

या प्रलंबित मागण्यांवर चर्चा करावी, यासाठी 8 जूनला नोटीस देण्यात आली. मात्र, त्या पत्राला शासन व प्रशासनाने कोणतेही उत्तर न देता संघटनेसोबत चर्चा न करता भरती करणे म्हणजे कंत्राटी कामगारांबाबत ‘गरज सरो व वैद्य मरो’ असे महाराष्ट्र शासनाचे दुटप्पी धोरण दिसून येत असल्याचा आरोप संघटनेतर्फे करण्यात आला.

कोरोना सारख्या महामारीच्या काळात जीव धोक्यात घालत, ऊन, वारा, पाऊस, वादळ वाऱ्याची तमा न बाळगता या वीज कंत्राटी कामगारांनी काम केले. विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यास मदत केली. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये 1 लाख रुपये जमा करून या कष्टकरी कामगारांनी मानवतावादी दृष्टिकोन देखील जपला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like