Pune : पौड रस्त्यावरील एमआयटी शाळेमध्ये सीबीएसई सुरु करण्याच्या निषेधार्थ पालकांचे आंदोलन

एमपीसी न्यूज- पौड रस्त्यावरील एमआयटी विश्वशांती गुरुकुल शाळेमध्ये एसएससी बोर्ड बंद करून सीबीएसई अभ्यासक्रम सुरु केल्याच्या निषेधार्थ पालकांनी आज सकाळपासून शाळेच्या समोर आंदोलन सुरु केले आहे. एमआयटी व्ही जी एस पालक कृती समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत आहे.

एमआयटी विश्वशांती गुरुकुल पालक कृती समितीच्या वतीने प्रसिद्धीपत्रक काढण्यात आले असून त्यामध्ये शाळेच्या प्रशासनाचा निषेध करण्यात आला आहे. या पत्रकात म्हटले आहे की, अवाजवी फीवाढ करण्याच्या हेतूने मागील अडीच वर्षांपासून एमआयटी शाळा प्रशासन दडपशाही करीत आहे. 80 टक्के पालकांचा विरोध असतानाही शाळा प्रशासनाने सीबीएसईची मान्यता मिळवली असून येत्या शैक्षणिक वर्षांपासून एसएससी बोर्ड पूर्णपणे बंद करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.

सध्या एसएससी बोर्ड इंग्रजी माध्यमाची फी 21 ते 25 हजार रुपये आहे. शाळेचा स्टाफ, इमारत, इतर सुविधा तशाच ठेवून फक्त सीबीएसईच्या नावाखाली 60 ते 70 हजार रुपये फी करण्याचा शाळा प्रशासनाचा विचार असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. ही फी मध्यमवर्गीय पालकांच्या आवाक्याबाहेरील आहे. त्यामुळे 1200 ते 1400 मुलांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. मागील वर्षभरापासून एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात असल्याची तक्रार पालकांनी केली आहे. याबाबत वेळोवेळी शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक, शिक्षण आयुक्त यांच्याकडे तक्रार अर्ज केले आहेत.

शाळेच्या या मनमानी धोरणाच्या विरोधात आज, सोमवार आणि उद्या मंगळवारी पालक आपल्या मुलांना सोबत घेऊन सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत धरणे आंदोलन करणार आहेत. तसेच बुधवारी (दि. 12) शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचे व्ही जी एस पालक कृती समितीने म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like