Pune : नोकर भरती प्रक्रियेत विश्वासात न घेतल्याच्या निषेधार्थ कंत्राटी वीज कामगारांचे आंदोलन

Agreement of contract power workers to protest against the lack of trust in the recruitment process

एमपीसी न्यूज – महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपनीतील नवीन नोकर भरती प्रक्रियेत विश्वासात न घेतल्याच्या निषेधार्थ कंत्राटी वीज कामगांरानी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या नेतृत्वाखाली सेनापती बापट रोड येथील प्रकाश भवन या कार्यालयासमोर आज, बुधवारी टाळ वाजवून शासनाचा निषेध केला.

महावितरण कंपनीमध्ये भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपनीतील कंत्राटी कामगारांसाठी महाराष्ट्र शासन, ऊर्जा मंत्री आणि प्रशासन यांना महाराष्ट्र कंत्राटी कामगार संघ यांनी 8 जूनला नोटीस दिली होती. याला उत्तर न देता भरती प्रकिया शासनाने राबवली. याच्या निषेधार्थ हे अनोखे आंदोलन करण्यात आले.

ऊर्जामंत्री आणि संबंधित अधिकारी यांना पांडुरंगाने सद्बुद्धी द्यावी, असे साकडे घालून त्यांनी सकारात्मक निर्णय घ्यावा. कंत्राटी कामगारांना नोकरीत सामावून त्यांना आरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली. या प्रश्नी तीनही कंपन्यांबाबत तोडगा निघाला नाही, तर येत्या 7 जुलैपासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

यावेळी पुणे जिल्ह्यातील सर्व वीज कंत्राटी कामगारांनी एकादशीनिमित्त शासनाच्या विरोधात वारकरी वेशात टाळ कुटून लक्षवेधी आंदोलन केले. या आंदोलनात महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे अध्यक्ष निलेश खरात, सरचिटणीस सचिन मेंगाळे, विजया भगत यांच्यासह कंत्राटी कामगार सहभागी झाले होते.

आपल्या मण्यांच्या पूर्ततेसाठी हे कंत्राटी कामगार शासनाकडे अनेक महिन्यांपासून पाठपुरावा करीत आहे. तसेच या प्रश्नी नुकतेच पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात समोर आंदोलन करण्यात आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.