Pune News : मुंबई आणि दिल्लीला मागे टाकत पुणे विमानतळ कमाईत नंबर वन

एमपीसी न्यूज : कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावादरम्यान, सर्वच क्षेत्रांवर परिणाम झाला असला तरी पुणे विमानतळाच्या व्यवसायात बरकत कायम राहिल्याचे समोर आले आहे. मुंबई आणि दिल्लीला मागे टाकत पुणे विमानतळाने बाजी मारली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आर्थिक वर्षात पुणे विमानतळ सर्वात फायदा मिळवून देणारे ठरले आहे. यासह दिल्ली आणि मुंबई विमानतळाच्या व्यवसायात मोठे नुकसान झाले होते.

सध्या एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियाकडे पुणे विमानतळाचा कारभार असून श्रीनगर आणि कानपूरच्या विमानतळाचा कारभार सध्या भारतीय हवाई दलाकडे आहे. गेल्या आर्थिक वर्षात पुणे विमानतळाच्या व्यवसायात १६.०९ कोटी, जुहू विमानतळ १५.९४ कोटी, श्रीनगर विमानतळ १५.९४ कोटी, पाटणा विमानतळ ६.४४ कोटी आणि कानपूर विमानतळाच्या व्यवसायात ६.०७ कोटी रुपयांचा फायदा झाला आहे.

सर्वाधिक फटका मुंबई विमानतळाला

कोरोनामुळे सर्वाधिक फटका बसलेल्या विमानतळांच्या यादीत मुंबई अग्रस्थानी आहे. गेल्या आर्थिक वर्षात मुंबई विमानतळाच्या व्यवसायात ३८४.८१ कोटी रुपयांचे नुकसान झाले. त्यानंतर चेन्नई २५३.५९ कोटी, त्रिवेंद्रम १००.३१ कोटी, अहमदाबाद ९४.१ कोटी या विमानतळांचा समावेश आहे. दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळाच्या व्यवसायात ३१७.४१ कोटी रुपयांचे नुकसान झाले. या दोन्ही विमानतळांमध्ये एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियाचा हिस्सा केवळ २६ टक्के आहे. तर मुंबई विमानतळाची ७४ टक्के भागीदारी अदानी समूहाकडे असल्याचे सांगितले जात आहे.

देशात १३८ विमानतळांना २,८८३ कोटींचा तोटा

गेल्या आर्थिक वर्षात देशातील १३८ विमानतळांना साधारण २ हजार ८८३ कोटींचा तोटा झाला.२०१९-२० या आर्थिक वर्षात १३६ विमानतळांच्या कारभारातील नुकसानीचा आकडा ८० कोटी तर २०१८-१९ या आर्थिक वर्षात हा आकडा ४६६ कोटी रुपये इतका होता. यावरून असे स्पष्ट होते की, झालेल्या व्यवसायात तोट्याचे प्रमाण अधिक वाढले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.