Pune News : पुणे विमानतळ 1 डिसेंबर पासून 24 तास सुरू राहणार

एमपीसी न्यूज – पुणे विमानतळावरून फक्त 12 तासच विमानांची वाहतूक सुरू आहे. लोहगाव – विमानतळावरील धावपट्टीच्या कामासाठी केवळ सकाळी 8 ते रात्री 8 या वेळात विमानाची उड्डाणे सुरू होती. पण, 1 डिसेंबरपासून 24 तास विमानांची उड्डाणे होणार आहे.

हवाई दलाकडून मागील वर्षी पासून धावपट्टीचे काम करण्यात येत होते. त्यामुळे काही काळ विमानतळ बंद ठेवण्यात येत होते तसेच विमान उड्डाणांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला होता. सकाळी 8 ते रात्री 8 या वेळातच केवळ उड्डाणे होत होती. 1 डिसेंबरपासून 24 तास विमानांची उड्डाणे सुरू होण्याची शक्यता आहे. विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांनीदेखील याला दुजोरा दिला आहे.

सध्या सुमारे 60 विमानांची ये-जा होत आहे. यातून 17 हजार प्रवाशांची ये-जा असते. 24 तास विमानांचे संचलन सुरू झाल्यास, 90 हून अधिक विमानांचे उड्डाणे होऊ शकतात. तर प्रवासी संख्येत देखील वाढ होणार आहे. सध्या नागरिकांना रात्री 8 च्या अगोदरच विमानप्रवास करावा लागत आहे. 24 तास उड्डाणे सुरू झाल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

येत्या 1 डिसेंबरपासून पुणे विमानतळावरून विमानांची वाहतूक 24 तास सुरू करण्यात येणार आहे. त्या संदर्भातील सर्व नियोजन आम्ही केले आहे. धावपट्टीच्या दुरुस्तीच्या कामामुळे सध्या 12 तास म्हणजे सकाळी 8 ते सायंकाळी 8 पर्यंत विमानांची वाहतूक सुरू आहे. 1 तारखेनंतर 24 तास सुरू होईल, अशी माहिती पुणे विमानतळ संचालक संतोष ढोके यांनी दिली.

पुणे विमानतळावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दिवसाला 17 ते 18 हजार प्रवासी येथून ये-जा करतात. त्यांची तपासणी करण्यासाठी मनुष्यबळ अपुरे पडत आहे. एखाद्या वेळी एखादी चुकीची घटना येथे घडू नये, याकरिता आम्ही लवकरच सीआयएसएफचे अतिरिक्त 500 जवान तैनात करणार आहे.’

विमानतळ प्रशासन फक्त मालवाहतुकीसाठीच भारतीय वायुदलाच्या ताब्यात असलेली 2.5 एकर जागा भाड्याने घेणार आहे. या संदर्भातील प्रक्रिया पूर्ण झाली असून, त्यामुळे आता पुण्यातून इतर राज्यांत विमानाने होणारी मालवाहतुकीची सेवा पूर्वीपेक्षा अधिक क्षमतेने आणि वेगवान होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.