Pune: अजित पवार, रोहित पवार, पार्थ पवार नव्हे मी एकटाच निवडणूक लढविणार – शरद पवार (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज – आगामी लोकसभेची निवडणूक अजित पवार, रोहित पवार आणि पार्थ पवार लढवणार नाहीत. पवार कुटुंबातून फक्त मीच निवडणूक लढवणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज स्पष्ट केले आहे. त्यामुळे मावळातून पार्थ पवार निवडणूक लढविण्याच्या चर्चेला पूर्ण विराम मिळाला आहे. दरम्यान, पार्थ यांच्या उमेदवारीला शरद पवार यांचा विरोध असून पार्थ निवडणूक लढविणार नसल्याचे वृत्त एमपीसी न्यूजने कालच प्रसिद्ध केले होते. ते तंतोतंत खरे ठरले आहे. शरद पवार यांच्या अधिकृत घोषणेने त्यास दुजोरा मिळाला असून एमपीसी न्यूजच्या वृत्ताची विश्वासार्हता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

पुणे एमआयटी शिक्षण संस्थेच्या लोणी काळभोरच्या संकुलात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरुढ पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवार यांनी सांगितलं.

  • गेल्या काही दिवसांपासून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार मावळ मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढविणार असल्याची चर्चा होती. पार्थ पवार यांचा पिंपरी-चिंचवड शहरातील राबता वाढला होता. पक्षाच्या कार्यक्रमासाठी शहरात येत होते. त्यांनी राष्ट्रवादीने शहरात केलेल्या विविध विकासकामांचा आढावा देखील घेतला होता.

पार्थ यांनी चिंचवड येथील मोरया गोसावी मंदीरात बाप्पाचे दर्शन घेऊन लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा श्री गणेशा केल्याचे बोलले जाऊ लागले होते. परंतु, आता पार्थ पवार निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

  • राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कुटुंबातील आपण एकमेव निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले. त्यामुळे अजित पवार, रोहित पवार, पार्थ पवार लोकसभेच्या मैदानात नसणार हे स्पष्ट झाले आहे. काही दिवसांपूर्वी शिरूरमधून कोण उमेदवार नसेल तर मी लढतो असे अजित पवार यांनी जाहीर केले होते. परंतु, तेही निवडणूक लढणार नाहीत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.