Pune : महापालिकेतील नगरसेवकांवरही अजित पवार यांची पक्कड!; आमदार चेतन तुपे-पाटील, सुनील टिंगरे यांच्या भूमिकेकडे लक्ष

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेतील नगरसेवकांवरही माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी पक्कड आहे. त्यामुळे या नागरसेवकांतील एक गट ‘अजितदादा’ गट म्हणून ओळखला जातो. एकूण 41 नगरसेवक असून त्यातील किती नगरसेवक अजित पवार यांच्या बरोबर जाणार? याची उत्सुकता लागली आहे.

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकत्र आल्याने राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. त्याचे पडसाद पुण्यातही उमटणार, हे निश्चित मानले जात आहे. राष्ट्रवादीच्या पुण्यातील आयोजित बैठकीतच अजित पवार शिवसेनेबरोबर जाण्यास इच्छुक नसल्याची चर्चा आहे. त्यांना भाजपबरोबर जाण्याची इच्छा होती. पण, शरद पवार यांनी काँगेस-राष्ट्रवादी-शिवसेना अशी महाशिव आघाडी स्थापन करण्यास पुढाकार घेतला आहे. अजित पवार तडकाफडकी निर्णयामुळे चर्चेत असतात. सध्या त्यांनी भाजपला पाठिंबा दिल्याने राजकीय भूकंप झाला आहे.

पुणे जिल्हा हा शरद पवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. 2014 पेक्षा 2019 मध्ये राष्ट्रवादीचे आमदार वाढले आहेत. पुणे शहरात मोदी लाटेत एकही आमदार नव्हता. यावेळी शरद पवार यांच्या जादूमुळे दोन आमदार वाढले आहेत. वडगावशेरी मतदारसंघातून सुनील टिंगरे तर, हडपसर मतदारसंघातून चेतन तुपे-पाटील आमदार म्हणून निवडून आले आहे.

या दोघांवरही अजित पवार आणि शरद पवार यांचा पगडा आहे. त्यामुळे हे दोन्ही आमदार काय भूमिका घेणार?, याची उत्सुकता आहे. या दोघांपकी एकाची मंत्रीपदी निवड निश्चित मानली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.