Pune : अखिल मंडई मंडळ देणार महिला व मुलींसाठी विनामूल्य पारंपरिक नृत्य प्रशिक्षण

एमपीसी न्यूज – अखिल मंडई मंडळाच्या वतीने वसंतराव थोरात यांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्त्री सशक्तीकरण, व्यक्तिमत्व विकास, संस्कृतीप्रधान, सांस्कृतिक कार्य अंतर्गत महिला आणि मुलींसाठी विनामूल्य पारंपरिक नृत्यप्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून महिला व मुलींना दर शनिवार-रविवार नृत्याचे विनामूल्य प्रशिक्षण देण्यात येणार असून संपूर्ण मे महिना दररोज हे प्रशिक्षण सुरु राहील. 5 ते 50 वयोगटातील मुली व महिला यामध्ये सहभाग घेऊ शकणार आहेत.

 

या नृत्य प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन ज्येष्ठ नृत्यांगना स्वाती दैठणकर यांच्या हस्ते झाले. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा झेंडे, माजी नगरसेविका मदिना तांबोळी, मंडळाचे अध्यक्ष आण्णा थोरात, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, विश्वास भोर, संकेत नलावडे, रोमा लांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

_MPC_DIR_MPU_II

या प्रसंगी बोलताना दैठणकर म्हणाल्या की, नृत्य म्हणजे स्वत:चा शोध असतो. ताल व तोल सावरताना कलाकाराची पृथ्वीशी नकळतपणे तार जुळली जाते. नृत्याद्वारे मानसिक, शारीरिक व अध्यात्मिक विकास होतो. स्वत:चा स्वत:शी केलेला मुक्त संवाद म्हणजे नृत्य. नृत्य हे दृश्य माध्यम असून त्याद्वारे चांगले विचार समाजापर्यंत पोहोचविले जातात. त्यामुळे शास्त्रीय नृत्यशैली हा भारतीय संस्कृतीचा जीवंत उद्गार आहे.

 

आपली कला ही समाजासाठी उपयोगी पडली पाहिजे. केवळ तळागाळातील स्त्रियाच नाहीत, तर चांगल्या घरातील स्त्रियांचे व्यक्तिमत्व देखील कोंडलेले असते. महिलांनी स्वत:पासून सुरुवात केली, तर समाज सुधारणा होईल. आत्मविश्वासाने महिला कोणतेही काम किंवा कला शिकू शकतात त्यामुळे महिलांनी पुढे यायला हवे असे मत दैठणकर यांनी व्यक्त केले.

 

हे नृत्यप्रशिक्षण प्रभुदास भैलुमे देणार आहेत तर या कामी राष्ट्रीय कला अकादमीचे सहकार्य त्यांना लाभणार आहे. महिला, मुलींना शास्त्रीय नृत्याचे चांगले धडे देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, असे अण्णा थोरात म्हणाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता शिंदे यांनी केले तर सारंग सराफ यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.