Pune: धोक्याची घंटा! केवळ कोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणं बेतलं 21 वर्षीय युुवकाच्या जीवावर!

Pune: Alarming! only Ignoring Corona symptoms was the cause of the death of a 21-year-old youth!

एमपीसी न्यूज – सुमारे 15 दिवसांपासून कोरोनाची लक्षणे जाणवत असतानाही त्याकडे दुर्लक्ष करणे पुण्यातील 21 वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतले आहे. श्वास घेणे जड जात असल्यामुळे या तरुणाला शुक्रवारी (22 मे) सायंकाळी साडेसात वाजता ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात म्हणजे आठ वाजता त्याचा मृत्यू झाला. हा कोरोना संशयित असल्यामुळे त्याची वैद्यकीय चाचणी केली असता ती कोरोना पॉझिटिव्ह आली. त्यानंतर डॉक्टरांनी खोलात जाऊन चौकशी केली असता त्याने कोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली.

पुण्यातील गुलटेकडी परिसरात वास्तव्यास असलेल्या या तरुणाला 15 दिवसांपासून कोरोनाची लक्षणं असल्याचे आढळले होते, परंतु याविषयी डॉक्टरांना न सांगता तो घरातच बसून राहिला. दरम्यान शुक्रवारी त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागले. श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. त्यानंतर त्याला तातडीने ससून रुग्णालयात  दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना अवघ्या अर्ध्या तासात त्याचा मृत्यू झाला.

मृत्यू झाल्यानंतर डॉक्टरांनी कोरोना संशयित असल्यामुळे त्याचे स्वॅब नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले. त्यात तो कोरोना पॉझिटिव्ह होता, हे स्पष्ट झाले. डॉक्टरांनी या तरुणाचा वैद्यकीय इतिहास तपासली असता त्यात तरुणाला इतर कोणताही जोखमीचा आजार नव्हता, असे दिसून आले, मात्र मागील 15 दिवसांपासून त्याच्यात कोरोनाची लक्षणे होती. पण केवळ दुर्लक्ष केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्याकडे कोणीही त्याकडे दुर्लक्ष करू नये. तातडीने घराजवळील रुग्णालयात जाऊन डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी. स्वतःबरोबरच आपल्या कुटुंबीयांचीही काळजी घ्यावी, असे आवाहन पुणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like