Pune Crime : आळेफाटा येथील आणे गावात पडलेल्या सशस्त्र दरोड्यातील दोन दरोडेखोरांना 24 तासांच्या आत अटक 

एमपीसी न्यूज : आळेफाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील (Pune Crime) आणे गावात पडलेल्या सशस्त्र दरोड्याचा पोलिसांनी छडा लावत 2 दरोडेखोरांना 24 तासांच्या आत अटक केले आहे.

अक्षय उंबर उर्फ उंबऱ्या काळे, वय 26 वर्षे, रा. सुरेगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर व विश्वजीत रामेश्वर सानप, वय २४ वर्षे रा. देहू, तालुका हवेली, जिल्हा पुणे, मुळ रा. गोविंदवाडी, तालुका माजलगाव, जिल्हा बीड या दोन दरोडेखोरांना अटक करण्यात आले आहे.

आळे फाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौजे आणे येथे 15 नोव्हेंबर रोजी रात्री 2.30 वा. चे सुमारास आनंदवाडी डोंगरेमळा येथे सुदाम डोंगरे, रा. डोंगरेमळा आनंदवाडी, आणे, ता. जुन्नर, जि. पुणे यांच्या राहत्या घरी ते, त्यांची पत्नी व आलेले नातेवाईक असे झोपलेले असताना एकूण सात ते आठ दरोडेखोरांनी त्यांच्या घराचा दरवाजा तोडून जबरदस्ती घरामध्ये प्रवेश केला. (Pune crime) तेथे दरोडा टाकून त्यांना दमबाजी तसेच काठीने व कुऱ्हाडीने मारहाण करून, जखमी करून त्यांच्या घरातील 16 हजार रुपये रोख रक्कम व त्यांची पत्नी अनुसया व मेव्हणी हिराबाई यांचे अंगावरील सोन्याचे दागिने असा एकूण 4.44 लाख रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने काढून घेतला. त्यांची पत्नी अनुसया व मेव्हणी हिराबाई यांच्या कानातील कर्णफुले ओरबाडून घेतल्या. या प्रकारात त्या जखमी झाल्या आहेत. त्या सर्वांना घरामध्ये बंद करून हे दरोडेखोर पळून गेले होते.

तसेच त्यानंतर माळवाडी आणे येथे राहण्यास असलेल्या सखू आहेर यांच्या घरावर सुद्धा या दरोडेखोरांनी दरोडा टाकून त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील सोने लुटून नेले. अशा आशयाची फिर्याद आळेफाटा पोलीस ठाण्यात दिल्यानंतर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने अंकित गोयल,  पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी गुन्हा घडतीस अन्नाच्या दृष्टीने तात्काळ तपास कामी मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या.

Pune News : पुणे रेल्वे विभागीय कार्यालयात संविधान दिन साजरा

त्यानुसार आळेफाटा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रमोद क्षीरसागर यांनी वेगवेगळी तपास पथके तयार करून त्या दरोडेखोरांचा शोध घेणे कामी रवाना केलेले होते. त्यानुसार हे पथक आळेफाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करीत असताना पोलीस हवालदार उमेश भगत व पोलीस कॉन्स्टेबल प्रविण आढारी यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मौजे पेमदरा, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे या गावाच्या परिसरातील जंगलात एक पांढऱ्या रंगाची मारुती सुझूकी इको कार ही संशयित रित्या फिरत आहे.

ही बातमी मिळाल्यानंतर आळेफाटा पोलीस ठाण्याच्या पथकाने तात्काळ तेथे जाऊन खात्री केली असता तेथे जंगलात एक पांढऱ्या रंगाची मारुती सुझूकी इको कार दिसून आली. परंतु तपास पथक यांना पाहताच त्यांनी गाडी सह तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता तपास पथकाने त्यांचा पाठलाग करून ती गाडी थांबवून त्याची पाहणी केली.

त्या गाडीमध्ये दोन संशयित इसम आढळून आल्याने त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे सविस्तर चौकशी केली असता आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.

त्यांना स्वताचे नावे व पत्ते विचारले असता त्यांनी त्यांची नावे अक्षय उंबर उर्फ उंबऱ्या काळे, वय 26 वर्षे, रा. सुरेगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर व विश्वजीत रामेश्वर सानप, वय 24 वर्षे रा. देहू, तालुका हवेली, जिल्हा पुणे, मुळ रा. गोविंदवाडी, तालुका माजलगाव, जिल्हा बीड अशी असल्याचे सांगितले.

आरोपी अक्षय उंबर उर्फ उंबऱ्या काळे, वय 26 वर्षे, रा. सुरेगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध यापूर्वी एकूण 12 गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये खून, चोरी, जबरी चोरी, दरोडा अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे.

त्यांनी त्यांच्या साथीदारांसह पारनेर येथे दोन ठिकाणी दरोडा टाकला असल्याची कबुली दिली आहे. या दोन दरोडेखरांना दरोड्या च्या गुन्ह्यात अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने  त्यांना बारा दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

या दरोडेखोरांकडून गुन्ह्यात वापरलेली पाच लाख रुपये किमतीची मारुती सुझुकी इको कार ही जप्त करण्यात आली आहे. पोलीस पथकाने या दरोड्याच्या गुन्ह्यांचा तात्काळ छडा लावून दोन दरोडेखोऱ्यांना अटक केली आहे. तसेच इतर सहा पाहिजे आरोपींची नावे निष्पन्न झाली असून त्यांना अटक करण्यासाठी वेगवेगळी तीन पदके रवना करण्यात आलेली आहेत. या गुन्ह्यांचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल पवार करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.