Pune: शिधापत्रिका नसली तरी तीन महिन्यांचे धान्य मोफत मिळायला हवे – फडणवीस

एमपीसी न्यूज – शिधापत्रिकाधारकांना तीन महिन्यांचे  धान्य मोफत देण्याचे स्पष्ट आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. त्याची त्याप्रमाणे कार्यवाही व्हावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. शिधापत्रिका नसली तरी मोफत धान्य दिले जावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

राज्य सरकारने 18 मार्च रोजी पहिला आदेश काढला. त्यात शिधा पत्रिकाधारकांना तीन महिन्याचे धान्य मोफत देण्याचा उल्लेख होता. नंतर 31 मार्च रोजी काढलेल्या आदेशात त्या-त्या महिन्याचे धान्य द्या, असे सांगितले. अशा दोन भिन्न आदेशांमुळे संभ्रमाचे वातावरण झाले आहे ते दूर व्हायला हवे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

शिधापत्रिकाधारकाने शिधापत्रिकेचा वापर केला नसेल तरी ते रद्द करण्यात येऊ नये, त्यावरही धान्य देण्यात यावे. शिवाय ज्यांच्याकडे शिधापत्रिका नसेल त्यांनाही आधारकार्डाच्या आधारे किंवा साक्षांकीत प्रती करुन तात्पुरते कार्ड पुरवावे आणि त्यावर धान्य देण्यात यावे. राज्यात धान्याअभावी कोणीही उपाशी राहू नये, अशी कळकळीची विनंती असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.