Pune : ‘त्या’ टीपी स्कीम महापालिकाच करणार

एमपीसी न्यूज- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)कडून उरूळी देवाची आणि फुरसुंगी या गावांमध्ये प्रस्तावित करण्यात आलेल्या तीन नगर रचना योजना (टीपी स्कीम) महापालिकेकडून करण्यात येणार आहे. त्यासाठीचा अभिप्रायवजा प्रस्ताव बांधकाम विभागाने आयुक्तांच्या मान्यतेसाठी ठेवला असून नंतर तो शहर सुधारणा समिती आणि मुख्यसभेच्या मान्यतेने राज्यशासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्य शासनाने मागील वर्षी 4 ऑक्‍टोबर 2017 रोजी हद्दीजवळील 11 गावे न्यायालयाच्या आदेशानुसार पालिका हद्दीत समाविष्ट केलेली आहेत. तर दोन वर्षांपूर्वी येवलेवाडी हे गाव पालिकेच्या हद्दीत आलेले आहे. त्यामुळे या गावांचा कारभार महापालिका सांभाळत असून त्यांच्यासाठीचे नियोजन प्राधिकरण महापालिका आहे. यातील 11 गावे ही पूर्वी “पीएमआरडीए’ हद्दीत होती. त्यामुळे “पीएमआरडीए’ या गावांचे नियोजन प्राधिकरण होते. त्यामुळे त्यांच्याकडून या गावांचा विकास आराखडा तसेच या गावांच्या नियोजनबद्ध विकासासाठी टीपी स्कीम, रिंगरोड तसेच इतर सुविधा प्रस्तावित केल्या होत्या. मात्र, शासनाने न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यशासनाने हद्दीजवळील 34 गावांपैकी 11 गावे पालिकेत समाविष्ट केली आहेत. त्यात आंबेगाव, उरूळी, फुरसुंगी या गावांचा समावेश आहे. तर, येवलेवाडी या पूर्वीच पालिकेत आलेली आहे. या गावांचा विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रिया पालिकेकडून सुरू करण्यात आलेली आहे.

मात्र, या गावांमध्ये “पीएमआरडीए’ने रिंगरोड तसेच टीपी स्कीम प्रस्तावित केल्या आहेत. या योजना राबविण्यासाठी “पीएमआरडीए’कडून स्वतंत्र “एसपीव्ही’ स्थापन केली जाणार आहे. त्यामुळे “पीएमआरडीए’ने शासनाकडे या 4 गावांसाठी “पीएमआरडीए’ला नगर रचना कायद्यानुसार, विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे या गावांमध्ये “पीएमआरडीए’लासुद्धा नियोजन करण्याचे अधिकार मिळणार होते. तसेच रिंग रोड आणि इतर योजनांसाठी मोठया प्रमाणात निधीची आवश्‍यकता असून या गावांच्या विकासातून तो उभा करणे शक्‍य होणार असल्याने ही मागणी करण्यात आली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like