Pune : हर्षवर्धन पाटील यांनी पवार कुटुंबियांवर केलेले आरोप धक्कादायक- खासदार सुप्रिया सुळे

एमपीसी न्यूज- इंदापूरची जागा राष्ट्रवादी लढवणार की काँग्रेसला सोडली जाणार, यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, असे असताना हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस व पवार कुटुंबियावर आरोप केले. हे आरोप आमच्यासाठी धक्कादायक आहेत, असे स्पष्टीकरण खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे आजही राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहेत, आणि यापुढेही राहतील, असा विश्वासही खासदार सुळे यांनी व्यक्त केला.

याबाबत बोलताना सुळे म्हणाल्या, ” काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये जागा वाटपात संबंधी चर्चा सुरू आहे. काही जागांचा तिढा सुटला असून इंदापूरच्या जागेचा निर्णय होणे बाकी असताना हर्षवर्धन पाटील यांनी केलेले आरोप आमच्यासाठी धक्कादायक आहेत. एका जबाबदार व्यक्तीकडे मी निरोप पाठवलेला आहे. त्यांच्याशी संपर्क होईल, अशी मला अपेक्षा आहे” असेही त्या म्हणाल्या.

“जे लोक राष्ट्रवादी सोडून जात आहेत, त्याचे कारण पक्षावर किंवा पवार कुटुंबीयांवर नाराजी आहे असे नसून कारखाना, बँक, इडीची चौकशी, अशा प्रकारच्या चौकशीच्या भीतीने ते पक्ष सोडून जात आहेत. जे कोणी जात आहेत, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेससाठी काहीना काही योगदान दिले आहे. त्यामुळे मी त्यांचा द्वेश न करता त्यांना शुभच्छा देते. नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या एका नेत्याच्या वडिलांना भाजपने प्रवेश नाकारल्याचे ऐकायला मिळाले. वडिलांचा अवमान झालेला असतानाही हे नेते भाजपमध्ये गेले. चाळीस चाळीस वर्ष एका पक्षात राहिलेल्या आणि विचारांशी बांधील असलेल्या ज्येष्ठ नेत्यांना मुलांसाठी मानहानी पत्करावी लागते. हे दुर्दैव आहे,असे सुळे म्हणाल्या. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे आजही राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहेत, आणि यापुढेही राहतील, असा विश्वासही खासदार सुळे यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.