Pune : मेट्रोला दिलेली जागा भागभांडवल म्हणून धरावी -काँगेसचे ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल यांची मागणी

एमपीसी न्यूज – पुणे शहरात जागेचे संपादन करून महापालिकेने पुणे मेट्रोला दिली. ती भागभांडवल म्हणून धरावी, अशी मागणी काँगेसचे ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल यांनी केली आहे. आजच्या बाजारभावाने या जागेचे मूल्य धरण्यात यावे. त्यासंदर्भातील विचारणा करणारे पत्र महापालिका आयुक्त सौरभ राव यांना देण्यात आले आहे. महापालिका प्रशासनाला मेट्रो संदर्भात विविध प्रश्नही बागुल यांनी विचारले आहेत.

पुणे शहरात मेट्रोचे काम चालू असून या प्रकल्पासाठी महापालिकेने जागा उपलब्ध करुन दिली आहे. मेट्रोचे स्टेशन, मेट्रो मार्ग, पूल व इतर संबंधित सुविधा यासाठी शहरातील जागा देण्यास महापालिकेची भूमिका कायम सहकार्याची आहे. मेट्रोच्या प्रकल्पामध्ये महापालिकेचा हिस्सा देखील असून, त्यानुसार महापालिकेच्या तिजोरीतून आर्थिक सहाय्य देखील वेळोवेळी केले जात आहे. महापालिकेच्या अंदाजपत्रकात याबाबत तरतूद आहे. वास्तविक पाहता मेट्रोचे काम चालू असून, अजून काही वर्षे हे काम चालणार आहे.

महापालिकेचे उत्पन्नाचे स्त्रोत कमी होत आहे. त्यामुळे नवीन उत्पन्नाचे स्रोत वाढणे गरजेचे आहे. महापालिकेचे कार्यक्षेत्र वाढल्याने मूलभूत सेवा सुविधा देतानाही आर्थिक तरतूद कमी पडत आहे. त्यामुळे विकासकामे करता येत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. सबब पुणे महापालिकेच्या जागा मेट्रो प्रकल्पाला देताना त्याचे बाजारमूल्य लक्षात घेणे व त्याचा आढावा घेऊन महापालिकेचा मेट्रो प्रकल्पातील हिस्यामध्ये त्याचा समावेश होणे गरजेचे आहे.

मेट्रो प्रकल्पातील भांडवलामध्ये महापालिकेची असलेली गुंतवणूक, शेयर यामधे त्याचा विचार केला आहे का? याबाबत महापालिकेची असलेली भूमिका स्पष्ट करावी, या प्रकरणी डिसेंबर 2019 च्या मुख्य सभेत लेखी प्रश्न दिलेले आहेत. त्याची उत्तरे देण्याची मागणी बागुल यांनी पत्रात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.