Pune : राज्यात सलून सुरू करण्यास परवानगी द्या : चंद्रकांत पाटील

Allow to start salons in the state: Chandrakant Patil

एमपीसी न्यूज – कोरोनासंबंधी सर्व काळजी घेऊन नियमावली तयार करून राज्यात सर्वत्र सलून पुन्हा सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. लॉकडाऊनमुळे गंभीर आर्थिक संकटात सापडलेल्या नाभिक समाजाला थेट मदत करावी, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.

लॉकडाऊनमुळे आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केलेल्या नाभिक समाजातील व्यावसायिकांच्या कुटुंबियांना भाजपाच्या आपदा कोषातून प्रत्येकी एक लाख रुपये मदत करण्यात येईल, असे पाटील यांनी जाहीर केले.

राज्यातील नाभिक समाजाच्या व सलून व्यावसायिकांच्या सुमारे 42 संघटनांच्या प्रतिनिधींसोबत चंद्रकांत पाटील यांची व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मंगळवारी बैठक झाली.

त्यानंतर राज्य सरकारने सलून चालवणाऱ्या व्यावसायिकांना मदत म्हणून ग्रामीण भागात 30,000 रुपये व शहरी भागात 50,000 रुपये थेट मदत करावी.

सलून व्यवसाय बंद असल्याने या काळातील वीज बिल माफ करावे, अशा मागण्या चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारकडे केल्या.

चंद्रकांत पाटील यांनी सर्व सलून व्यावसायिकांना आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करण्याचे आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रमजिवी वर्गासाठी सुरू केलेल्या विमा योजनांचा लाभ घ्यावा, असेही आवाहन त्यांनी केले.

या बैठकीसाठी उदय टक्के यांनी पुढाकार घेतला. महाराष्ट्र अहेड पत्रकारिता संघटनेचे प्रमुख हरिष प्रभू समन्वयक होते. बैठकीत संतोष सापके आणि भक्ती सापके, दत्तात्रय अनारसे, दिशा मेहेर, संगीता चौहान यांनी मते मांडली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.