Pune : स्थायी समितीच्या बैठकीत ठराव मंजूर होऊनही धान्य वाटपाची अंमलबजावणी नाही

एमपीसी न्यूज – पुणे शहरात सध्या कोरोनाचे भयानक संकट उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत गोरगरीब नागरिकांना प्रत्येकी 5 किलो गहू, 3 किलो साखर, 3 किलो तांदूळ, 1 किलो तेल, 1 किलो मसाला, 1 किलो डाळ देण्यात यावी. यासाठी 5 लाख रुपये प्रत्येक नगरसेवकांच्या निधीतून तून खर्च करण्यात यावा, असा ठराव स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. मात्र, त्याची महापालिका प्रशासन अंमलबजावणी करीत नसल्याचे विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी सांगितले.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी तर 5 नव्हे 10 लाख रुपये खर्च करा, पण नागरिकांना अन्नधान्य द्या, असे आदेश दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन जाहीर करून आता 42 दिवसांचा कालावधी झाला आहे. या दरम्यान सर्वसामान्य नागरिकांजवळील होते नव्हते ते सर्व संपले आहे. त्यातही सध्या हाताला काम नाही, घरांत पैसे नाही, मग या नागरिकांनी जगायचे कसे, असा सवालही धुमाळ यांनी उपस्थित केला आहे.

शहरातील झोपडपट्ट्या आणि जुन्या पेठांमध्ये कोरोना मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या भागांत कामगार, मजूर, कष्टकरी, शहर स्वच्छ करणारे सेवक, रिक्षा, टेम्पो, ओला – ओबेर वाहतूक चालक, पथारी व्यावसायिक, असे सर्वसामान्य पुणेकर आहेत. गेल्या दीड महिन्यात त्यांच्याकडे होते नव्हते ते आता संपले आहे. त्यामुळे आता तरी महपालिका प्रशासनाने गोरगरिबांना अन्नधान्य वाटप करण्याची गरज निर्माण झाली आहे.

त्यामुळे महापालिका स्थायी समिती बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या ठरावाची तातडीने अंमलबजावणी करून गोरगरिबांना गोरगरीब नागरिकांना प्रत्येकी 5 किलो गहू, 3 किलो तांदूळ, साखर, तेल वाटप करावे, अशी मागणी धुमाळ यांच्यासह अन्य नगरसेवकांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.