Pune : देशाच्या विकासामध्ये सिंहाचा वाटा असणारे कष्टकरी खऱ्या अर्थाने श्रमयोगी – खासदार अमर साबळे

एमपीसी न्यूज- लोकशाहीर आण्णाभाऊ साठे म्हणतात की ही पृथ्वी शेषनागाच्या डोक्यावर तरली नसून कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे. म्हणजेच या देशाच्या जडणघडणीमध्ये देशातील कष्टकरी वर्गाचा सिंहाचा वाटा आहे. कष्टाने घाम गाळून देशाच्या विकासामध्ये हातभार लावणारे तसेच श्रमालाच कर्म आणि धर्म मानणारे कष्टकरी हे खऱ्या अर्थाने श्रमयोगी आहेत, असे प्रतिपादन राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी केले.

देशातील असंघटित कामगार आणि बांधकाम कामगार यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजपासून सुरू केलेल्या ‘प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना’ या महत्तवाकांक्षी योजनेचा शुभारंभ आज करण्यात आला. दरम्यान, पुणे जिल्हा परिषद येथील स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या शुभारंभ कार्यक्रमात खासदार साबळे बोलत होते.

यावेळी खासदार अनिल शिरोळे, प्रॉव्हिडंट फंड, पुणेचे क्षेत्रीय आयुक्त अरुण कुमार, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी या योजनेत नावनोंदणी केलेल्या दहा लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात या योजनेच्या कार्डचे वाटप खासदार साबळे यांच्या हस्ते करण्यात आले.

या योजनेंतर्गत देशातील असंघटित कामगारांना वयाच्या 60 वर्षानंतर दरमहा 3 हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. त्यासाठी 18 ते 40 वयोगटातील तसेच 15 हजार रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या असंघटित कामगारांनी या योजनेत नावनोंदणी करणे आवश्यक आहे. नावनोंदणी करणाऱ्या कामगारांना दरमहा 55 रुपये ते 200 रुपये आपल्या बँक खात्यात जमा करावे लागणार आहे.

यावेळी उपस्थित कामगारांना मार्गदर्शन करताना खासदार साबळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सबका साथ सबका विकास या घोषणेच्या माध्यमातून या देशातील 125 कोटी जनतेचा विकास करण्याचे व्रत आपल्या हाती घेतले आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे अंतोदयाचे तत्वज्ञान अंगीकारून या देशाच्या समाजव्यवस्थेच्या शेवटच्या पायरीवर उभे असलेल्या दलित, पीडित, शोषित, वंचित, महिला, शेतकरी या सर्वांचे कल्याण झाले पाहिजे हा ध्यास घेतल्यानंतर त्या ध्यासातूनच या योजनेचा उगम झाला आहे. म्हणूनच या योजनेचे नाव ‘प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना’ असे ठेवण्यात आले आहे.

देशासाठी राबणारा प्रत्येक माणूस हा देशाच्या विकासाचा शिल्पकार आहे. आणि या शिल्पकाराला मान-सन्मान, प्रतिष्ठा मिळाली पाहिजे आणि त्याच्या उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध केले पाहिजे. कारण देशातील कष्टकरी सर्वसामान्य माणूस सुखी तरच देश खऱ्या अर्थाने सुखी होईल अशी धारणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची आहे.

या योजनेचा लाभ देशातील तळागाळातील जास्तीत जास्त गरजू नागरिकांना मिळाला पाहिजे यासाठी संबंधित विभागाने ही योजना प्रत्येक गावागावात तसेच शेवटच्या नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करावा आणि ही योजना यशस्वीपणे राबवावी असे आवाहन खासदार साबळे यांनी यावेळी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.