Pune : देशात संतांचा ‘ब्रँड ‘होतोय, संतत्व संपतेय – डॉ. आनंद नाडकर्णी

एमपीसी न्यूज- देशात संतांचा ‘ब्रँड ‘होतोय आणि एखाद्या गोष्टीचा ब्रँड बनला की त्यातील संतत्व संपते. ‘ड्रग,फॅशन आणि स्पिरिच्युऍलिटी’ या मार्केट मानल्या गेलेल्या क्षेत्रात सतत नवीन द्यावे लागते, त्या नवनवीनपणाच्या नादात ब्रँड बनणाऱ्याचे संतत्व संपते त्यामुळे ‘ मी केलं ‘ ही भावना सोडा. स्वतःतील व्यापकतेचा विस्तार करून सहिष्णू व्हा, असा सल्ला ज्येष्ठ मानसशास्त्रज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी दिला.

पुण्याच्या कार्पोरेट जगतातील मनुष्यबळ विकास व्यवस्थापकांची शिखर संस्था असलेल्या ‘ओन्ली एच आर ‘ संस्थेचा पाचवा वर्धापनदिन आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ‘ संतांचे मानसशास्त्र ‘ या विषयावर डॉ. आनंद नाडकर्णी बोलत होते.

डॉ . नाडकर्णी म्हणाले,”स्व पणाचे विसर्जन ही भारताची अध्यात्मिक संत परंपरा आहे . ‘मी’ पणाकडून ‘आम्ही’ कडे भारतीय संस्कृती नेते. आपण जरी संत होऊ शकणार नसलो तरी प्रत्येकातील संतत्व जागे करण्याची संधी प्रत्येकाला असते. ‘स्व’च्या पलीकडे जाणे ही संतत्वाची पहिली पायरी आहे. हे संतत्व आपल्याला भेदाभेदांच्या पलीकडे दिव्यत्वाकडे नेते. प्रत्येक व्यक्तीत परमात्मा बनण्याची क्षमता असते ती विसरता कामा नये. ‘ मी केलं’ ही भावना आपल्या दैनंदिन कामातून घालवणे हेच अध्यात्म आहे. म्हणून मनुष्यबळ विकसक व्यवस्थापकांनी सहकाऱ्यांच्या प्रगत भावनांना उन्नत भावनांकडे नेले पाहिजे ”

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट म्हणाले, “मनुष्यबळ विकासकांनी कर्मचाऱ्यांचा कामातील पुढाकार टिकविला पाहिजे. फक्त मेमो देत राहिलो तर कर्मचारी जीव ओतून काम करणार नाहीत. दुसऱ्याचे मन ओळखण्यासाठी परकाया प्रवेश करण्याची क्षमता मनुष्यबळ व्यवस्थापकात असली पाहिजे . मनाच्या चुकांकडे उदारतेने पाहता आले पाहिजे”

‘ओन्ली एच आर’ संस्थेचे अध्यक्ष सुधीर फाटक, सचिव प्रशांत इथापे, खजिनदार जितेंद्र पेंडसे उपस्थित होते. पुण्याच्या कार्पोरेट जगतात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मनुष्यबळ विकास व्यवस्थापकांचा सत्कार ‘ एचआर प्रोफेशनल अॅवार्ड देऊन यावेळी डॉ. अनिल अवचट, डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्यात विपुल दवे, हेमांगी धोकटे यांचा समावेश होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.