Pune: संतापजनक! रुग्णवाहिका न मिळाल्याने रुग्णाचा घराबाहेर रस्त्यावरच बसल्या जागी मृत्यू

Pune: Annoying! The patient died while sitting on the road outside the house due to non-availability of ambulance

एमपीसी न्यूज – सुमारे तीन तास रुग्णवाहिका न मिळाल्याने ‘सीलबंद’ असलेल्या नाना पेठेतील एका रहिवाशाचा रस्त्यावरच खुर्चीत बसल्या जागी मृत्यू झाला. हा डोळ्यांनी पाहण्याचा दुर्दैवी प्रसंग त्या व्यक्तीचे कुटुंबीय आणि शेजाऱ्यांवर ओढवला. या प्रकाराबद्दल शहरात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

यशूदास मोती फ्रान्सिस (वय 54) असे या घटनेतील मृत व्यक्तीचे नाव आहे. फ्रान्सिस हे नाना पेठेतील रहिवासी असून त्यांचा रस्त्यावर खुर्चीतील मृतदेहाचा तसेच त्यांची पत्नी आणि कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रियांचा व्हिडिओ शुक्रवारी रात्री उशिरा व्हायरल झाला आणि शहरात एकच खळबळ उडाली. या घटनेत पोलीस आणि स्थानिक नागरिक कोणीही मदतीला आले नाही, असा आरोप फ्रान्सिस यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

फ्रान्सिस यांना रात्री एक वाजण्याच्या सुमारास तब्येतीचा त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी नातेवाईकांनी प्रयत्न केले. दीड वाजता डुल्या मारुती चौकात फ्रान्सिस यांना आणले आणि वाहनांची शोधाशोध केली. वाहन न मिळाल्याने 100 आणि 108 क्रमांकावर फोन केले पण रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही.

अत्यवस्थ झाल्याने फ्रान्सिस यांना रस्त्यावरच असलेल्या एका खुर्चीवर बसविण्यात आले. त्या खुर्चीवरच त्यांची प्राणज्योत मालवली. पहाटे पावणेचार वाजता एका टेम्पोमधून फ्रान्सिस यांना ससून रुग्णालयात नेण्यात आले. पण, डॉक्टरांनी तपासणी करून रुग्णालयात आणण्यापूर्वीच  त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले. मृत्यूचे नेमके कारण अद्यापि स्पष्ट होऊ शकलेले नाही.

या प्रसंगामुळे  पुणे शहरात लॉकडाऊनच्या काळात रुग्णवाहिका देखील मिळणे अवघड असल्याचे दाहक वास्तव समाजापुढे आले आहे. लॉकडाऊनमध्ये रुग्णांना वैद्यकीय अत्यावश्यक सेवा उपलब्ध होतील, याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी, अशी अपेक्षा पुणेकरांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.