Pune: कोरोनाचे संकट रोखण्यासाठी आणखी एका अधिकाऱ्याची नियुक्ती

Pune: Another officer appointed to prevent corona crisis उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्याचे आदेश यापूर्वी दिले आहेत.

एमपीसी न्यूज- कोरोनाचे संकट आटोक्यात आणण्यासाठी आणखी एका अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.

पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले आहे. शहरात आता कोरोनाचे 29 हजार 107 रुग्ण झाले आहेत. 18 हजार 825 नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे.

कोरोनाचा प्रादूर्भाव कमी करण्यासाठी लोकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकारणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांची नियुक्ती केली आहे.

उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्याचे आदेश यापूर्वी दिले आहेत. त्यानुसार विविध अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत.

लोकसहभाग वाढविण्यासाठी तत्कालीन कृषी आयुक्त सुहास दिवसे यांची निवड करण्यात आली होती. पण, त्यांची आता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आयुक्तपदी नेमणूक झाल्याने ही जबाबदारी निंबाळकर यांच्याकडे देण्यात आली आहे.

पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणूनही निंबाळकर यांनी काम केले आहे. त्यांना या कामाचा चांगला अनुभव आहे. लोकसहभाग वाढविण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातील अधिकारी आणि कर्मचारी यांचा वापर करण्याच्या सूचना डॉ. म्हैसेकर यांनी दिल्या आहेत.

याबाबतच्या कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने नोडल ऑफिसर नियुक्त केले आहेत. लोकसहभाग वाढविण्यासाठी करण्यात आलेल्या कामाचा अहवाल दररोज सायंकाळी ई-मेलद्वारे पाठविण्याचे आदेश डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिले आहेत.

कोरोनाचे संकट आटोक्यात आणण्यासाठी 10 दिवसांचा पुणे शहरात कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.