Pune: पुण्यात अ‍ॅन्टीजेन किटच्या वापराला सुरुवात- महापौर मोहोळ

Pune: Antigen kit started to be used in Pune- Mayor murlidhar mohol या टेस्टमुळे निगेटिव्ह निदान करण्याचे प्रमाण 99.3 ते 100 टक्के आहे. तर पॉझीटिव्ह निदानचे प्रमाण 50.6 ते 84 टक्के (रुग्णाच्या शरीरातील व्हायरल लोड नुसार) आहे.

एमपीसी न्यूज- पुणे शहरात कोरोनाच्या चाचण्या मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आल्या आहेत. बुधवारी डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालय येथे कोरोना-19 बाधित रुग्णांवर त्वरीत उपचारासाठी आवश्यक असलेल्या अ‍ॅन्टीजेन किटच्या वापरास सुरुवात करण्यात आली. या किटमुळे अर्ध्या तासात कोरोना पॉझिटिव्ह – निगेटिव्ह कळणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

यावेळी आयुक्त शेखर गायकवाड, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे, आरोग्य प्रमुख डॅा. रामचंद्र हंकारे, सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे आणि रुग्णालयातील इतर डॉक्टर्स व सेवक उपस्थित होते.

कोविड-19 बाधेसाठी सद्यस्थितीत आर.टी.पी.सी.आर. ही एकमेव निदान चाचणी आहे. कोविड बाधेची निश्चिती लवकरात लवकर होण्यासाठी अनेक प्रयोगशाळांमध्ये संशोधन सुरु आहे. आता आयसीएमआरने तपासणीअंती स्टँडर्ड क्यू कोविड 19 एजी डिटेक्शन किटव्दारे SARS-COV-2 चे अ‍ॅन्टीजेन निदान होत असल्याचे खातरजमा केलेली आहे.

या टेस्टमुळे निगेटिव्ह निदान करण्याचे प्रमाण 99.3 ते 100 टक्के आहे. तर पॉझीटिव्ह निदानचे प्रमाण 50.6 ते 84 टक्के (रुग्णाच्या शरीरातील व्हायरल लोड नुसार) आहे.

त्यामुळे अत्यंत तातडीच्या प्रसंगी ही किट वापरुन निदान करता येणे शक्य असल्याने कोविड-19 साठी रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्ट करण्यास आयसीएमआरसह ऑल इंडीया इन्स्टि्टयुट ऑफ मेडिकल सायन्सनेही तपासणीअंती स्टँडर्ड क्यू कोविड 19 एजी डिटेक्शन किटला मान्यता दिलेली आहे.

‘या टेस्टचा वापर कंन्टेंमेंट झोन, हॉटस्पॉटमध्ये वैद्यकीय अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली करता येणे शक्य आहे.

फ्लू सदृश्य लक्षणे असलेल्या तसेच अतिजोखमीच्या व्यक्तींच्या संपर्कातील लक्षणे नसलेल्या व इतर हृदय विकार/ फुफ्फुस/ यकृत/ मुत्रपिंड विकार/ मधुमेह तसेच रक्तदाब आदी विकार असलेल्या त्याचप्रमाणे केमो थेरपी, एचआयव्ही पॉझीटिव्ह, अवयव प्रत्यारोपण केलेले किंवा वयोवृध्द व्यक्तींवर तसेच गरोदर महिलांवर तातडीने उपचारासाठी/ रुग्णालयामध्ये आंतररुग्ण भरतीसाठी तातडीची चाचणी म्हणून या रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्टचा उपयोग करणे शक्य आहे.

ही चाचणी रुग्ण असलेल्या जागेवर, निदानासाठी स्त्राव घेतल्यानंतर एक तासाच्या आत व वैद्यकीय अधिका-याच्या निरीक्षणाखालीच करणे शक्य असल्याचे आयसीएमआरने त्यांच्या मार्गदर्शिकेमध्ये नमूद केलेले आहे.

तसेच या चाचणीचे निदान केवळ 15 व जास्तीत जास्त 30 मिनिटात होत असल्याने कोणत्याही बाह्य उपकरणांशिवाय नुसत्या डोळ्याने करता येणे शक्य आहे, असेही महापौरांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like