Pune : बाजार समित्या नियमित सुरू राहणार; पणन संचालकांची माहिती

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व बाजार समित्यांनी उपाययोजना करण्याबाबत पणन संचालकांनी सूचना दिल्या आहेत. मात्र याचा बाजार समित्यांच्या कामकाजावर कोणताही परिणाम होणार नसून बाजार समितीचे मुख्य बाजार आणि उपबाजार नियमितपणे सुरू राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे पणन संचालक सुनील पवार यांनी दिली.

पणन संचालक सुनील पवार यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या संबंधित पदाधिकाऱ्यांना कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच बाजार समित्यांमध्ये आवक होणारा अन्नधान्य, कडधान्य, फळे, भाजीपाला, इत्यादी माल हा जीवनावश्यक वस्तूंचा भाग आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा विशेषता गहू, ज्वारी, तांदूळ, तूरडाळ, हरभराडाळ, कांदा, बटाटा, लसुन इत्यादींचा व्यापार ग्राहकांच्या दृष्टीने सुरळीत चालू राहणे अत्यंत आवश्यक आहे. शेतकऱ्यांनाही शेतमाल विक्रीमध्ये कोणत्याही प्रकारे अडचण येणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे.

वरील प्रमाणे बाजार समित्या सुरळीतपणे सुरू ठेवण्यासाठी मुख्य बाजार आणि उपबाजार नियमितपणे सुरू राहणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा माल विक्री करताना कोणतीही अडचण येणार नाही, तसेच ग्राहकांनाही मालाचा सुरळीत पुरवठा होत राहील. बाजार समित्यांना बाजार आवारामध्ये स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. मात्र, त्यासाठी बाजार बंद ठेवणे उचित नाही. बाजार समित्यांनी बाजाराची स्वच्छता शक्‍यतो रात्रीच्या वेळी अथवा बाजार वेळ संपल्यानंतर करावी. राज्यातील सर्व बाजार समित्यांचे कामकाज नियमितपणे चालू राहण्याबाबत सर्व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनाही सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच जिल्हा उपनिबंधक यांनी याबाबतचा दैनंदिन आढावा घेण्याचेही पणन संचालकांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.