Pune : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या प्रवास नियोजनासाठी अधिका-यांची नियुक्ती : जिल्हाधिकारी

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणू प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना संदर्भात विस्थापित कामगार,  यात्रेकरु,  पर्यटक,  विद्यार्थी व इतर व्यक्ती यांच्या प्रवासाकरिता नियोजनासाठी अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे,  अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशांतर्गत कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण आढळत आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरुन व देशांतर्गत विमान प्रवासाद्वारे प्रवासी भारतात व इतरत्र प्रवास करीत आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूचे संशंयित रुग्ण पुणे शहरातही आढळून आले आहे.

यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणूच्या संसर्गात अधिक वाढ होऊ न देता तात्काळ उपाययोजना आखणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार नमूद व्यक्तींची प्रवास व्यवस्था व त्याचे नियोजन करणे अगत्याचे झाले आहे, असे जिल्हाधिकारी   नवल किशोर राम  यांनी सांगितले.

पुणे जिल्हयात आपत्ती व्यवस्थापन कायदयान्वये अधिकाऱ्यांची  पुढील आदेशापर्यंत निश्चित नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे ( मो.नं.9423043030) यांच्याकडे पुणे जिल्हयामध्ये  बाहेरच्या राज्यामध्ये जाणा-या स्थलांतरित कामगारांच्या संबंधित नोडल अधिकारी यांच्याकडून यादी प्राप्त करुन घेणे तसेच संबंधित कामगारांचे स्क्रिनिंग झाल्याबाबतची खात्री करणे.

तसेच त्या संबंधित राज्याकडून परवानगी घेणे, परवानगी पत्र तयार करुन घेणे व त्यांना संबंधित राज्यामध्ये पाठविण्यासाठी बस, रेल्वे  याबाबतची व्यवस्था करणे इ.जबाबदारी देण्यात आली आहे.

उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्र.3 श्रीमंत पाटोळे ( मो.नं.9075748361) यांच्याकडे पुणे महानगरपालिका हद्दीतून बाहेरच्या राज्यामध्ये जाणा-या स्थलांतरित कामगारांची यादी तयार करणे व संबंधित कामगारांना त्या त्या राज्यामध्ये पाठविण्याबाबत संबंधित अधिकारी यांच्याशी समन्वय ठेऊन कामकाज करणे.

उपजिल्हाधिकारी, नोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालय, पुणे,  हिम्मत खराडे ( मो.नं.9422072572) यांच्याकडे पिंपरी-चिंचवड  महानगरपालिका हद्दीतून बाहेरच्या राज्यामध्ये जाणा-या स्थलांतरित कामगारांची यादी तयार करणे व संबंधित कामगारांना त्या त्या राज्यामध्ये पाठविण्याबाबत संबंधित अधिकारी यांच्याशी समन्वय ठेऊन कामकाज करणे.

उपजिल्हाधिकारी,भूसंपादन क्र.17 आरती भोसले  ( मो.नं.9822332298) यांच्याकडे ग्रामीण हद्दीतून बाहेरच्या राज्यामध्ये जाणा-या स्थलांतरित कामगारांची यादी तयार करणे व संबंधित कामगारांना त्या त्या राज्यामध्ये पाठविण्याबाबत संबंधित अधिकारी यांच्याशी समन्वय ठेऊन कामकाज करणे तर सर्व उपविभागीय अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील स्थलांतरित कामगारांना पुणे जिल्हयातून इतर जिल्हयात जाणा-या स्थलांतरित कामगारांची यादी तयार करुन संबंधित जिल्हयाकडून परवानगी प्राप्त करुन घेऊन संबंधितांना त्या त्या जिल्हयामध्ये पाठविणेकामी बसेसची व्यवस्था करणे.

तसेच पुणे जिल्हयातून बाहेरच्या राज्यामध्ये जाणा-या स्थलांतरित कामगारांची यादी संबंधित नोडल अधिकारी यांच्याकडे सादर करण्याचे आदेश  जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम  यांनी दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.