Pune : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या डेप्युटी कमांडंट व प्रमुख प्रशिक्षकपदी रिअर अॅडमिरल अतुल आनंद यांची नियुक्ती

Appointment of Rear Admiral Atul Anand as Deputy Commandant and Head Trainer of National Defense Academy

एमपीसी न्यूज – पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे डेप्युटी कमांडंट आणि प्रमुख प्रशिक्षक म्हणून रिअर अॅडमिरल अतुल आनंद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी नुकताच आपला पदभार स्वीकारला आहे. यापूर्वी ते संरक्षण मंत्रालयाच्या (नौदल) नवी दिल्लीतील एकात्मिक मुख्यालयाचे (विदेश सहकार्य आणि इंटेलीजन्स) सहाय्यक प्रमुख म्हणून कार्यरत होते.

रिअर अॅडमिरल अतुल आनंद यांची 1988 साली भारतीय नौसेनेच्या एक्झिक्यूटिव्ह शाखेत नेमणूक झाली. नेव्हीगेशन आणि दिशादर्शन क्षेत्रातील विशेषज्ञ म्हणून त्यांची ख्याती आहे.

रिअर अॅडमिरल आनंद हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे (71 व्या बॅचचे) माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी डिफेन्स सर्व्हीसेस कमांड आणि स्टाफ कॉलेज ,बांगलादेश आणि नवी दिल्लीतील राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालय येथेही त्यांनी प्रशिक्षण घेतले आहे.

यूएसएमधल्या हवाई येथील प्रतिष्ठित आशिया पॅसिफीक सेंटर फॉर सिक्युरीटी स्टडीज येथून प्रगत संरक्षण सहकार्य प्रशिक्षणही घेतले आहे.

रिअर अॅडमिरल आनंद यांनी टॉरपेडो रिकव्हरी व्हेसल A72, क्षेपणास्त्र नौका आयएनएस चातक, कॉरव्हेट आयएनएस खुक्री आणि डिस्ट्रॉयर आयएनएस मुंबई यांचे यशस्वी नेतृत्वही केले आहे.

आयएनएस चातकला युनिटचे प्रशस्तीपत्र तर आयएनएस मुंबई हे पश्चिम विभागाच्या ताफ्यातील सर्वोत्तम जहाज म्हणून निवडले गेले होते.

त्यांनी सी हॅरिअर स्क्वॅड्रन आयएनएस 300 साठी दिशादर्शक अधिकारी तर डिस्ट्रायर आयएनएस दिल्लीसाठी कार्य प्रबंधक म्हणून देखील सेवा बजावली आहे.

त्यांनी सहाय्यक संचालक कार्यालयीन निवड, संरक्षण सेवा स्टाफ कॉलेज निदेशक वेलिंग्टन, नेव्हल इंटेलिजन्स ऑपरेशन्स संचालक, प्रमुख संचालक नेव्हल ऑपरेशन्स, आदी महत्वपूर्ण कार्यालयीन पदेही भूषविली आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.