Pune : जिल्हयात 6 हजारांच्या आसपास कोरोनाचे रुग्ण

Pune: Around 6,000 corona patients in the district

एमपीसी न्यूज – पुणेकरांसाठी आज चिंता वाढविणारी बातमी आहे. दि. 25 मे रोजीच जिल्ह्यात कोरोनाचे 5 हजार 899 रुग्ण झाले आहेत.

अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पुणे शहरात 90 टक्के भाग खुला करण्यात आला आहे. त्यामुळे शहरात झपाट्याने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे मास्क लावणे, सॅनिटायजरचा वापर करणे, सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळण्याचे आवाहन प्रशासनातर्फे वारंवार करण्यात येत आहे.

पुणे शहरातील कंटेन्मेंट झोन वगळता सर्वच परिसरात आता वर्दळ वाढली आहे. ठिकठिकाणी सिग्नलही सुरू झाले आहेत. पूर्वीप्रमाणेच पुणे रुळावर येताना दिसून येत आहे. जीवनावश्यक वस्तूंपासून, सोने – चांदी, कापड, मोबाईल अशी सर्वच दुकाने उघडी आहेत.

मात्र, पुणेकर खर्च करताना हात आखडताच घेत आहेत. मागील 3 महिन्यांपासून कोरोनाचे संकट पुण्यात गंभीर झाले आहे. हाताला काम नाही, घरात होते नव्हते ते आता संपले आहे, पैसे कधी येणार त्याचा पत्ता नाही. त्यामुळे आता काही जी काही रक्कम उरली आहे, त्यातून किरणामाल, भाजीपाला यालाच प्राधान्य देण्यात येत आहे.

कोरोनाचे संकट कधी दूर होईल, हे कुणीही सांगू शकत नाही. सुरुवातीला काही दिवस दारूच्या दुकानंसमोर मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यात आली होती. ती गर्दीही आता कमी झाली आहे. लक्ष्मी रोडवर दुकाने सुरू करण्यात आली आहेत. मात्र, ग्राहकांची प्रतीक्षा आहे.

कोरोना नसलेल्या भागांत 12 तास दुकाने सुरू करण्याचा आदेश महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिला आहे. शहरात तसेच उपनगरांत सध्या मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली आहे. पण, अपेक्षित खरेदी होत नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

मागील 3 महिन्यांत लॉकडाऊनमुळे घरातील होता नव्हता तेवढा पैसा संपला आहे. लक्ष्मी रोड, बाजीराव रोड, टिळक रोडवरील दुकानांत सध्या वर्दळ वाढली आहे. शहरातील रस्त्यांवर सिग्नलही सुरू झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.