Pune: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या निवास व्यवस्थेत नागरिकांचे आगमन

एमपीसी न्यूज – कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या वतीने शहरातील दाट लोकवस्ती व झोपडपट्टी परिसरातील नजीकच्या मनपा शाळेत तात्पुरत्या स्वरूपाची दिवस- रात्र सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मंगळवारी नवी पेठेतील धर्मवीर संभाजी महाराज प्राथमिक विद्यालय–१७ बी, नवी पेठ शाळेत नवी पेठ व सदाशिव पेठेतील सुमारे ४३ नागरिकांनी तात्पुरत्या निवासस्थानी आश्रयाकरिता वरीलप्रमाणे नोंदणी केल्याचे शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी मनीषा राऊत यांनी सांगितले. 

कोरोना विषाणू प्रादुर्भाव प्रतिबंधात्मक उपाय योजनेअंतर्गत पुणे महापालिका शाळेत शहरातील दाट लोकवस्ती व शहरातील झोपडपट्टी परिसरात कोरोना विषाणू प्रादुर्भावावर नियंत्रण राखणेकरिता हा निर्णय घेण्यात आला आहे.  परिसरातील निवासाच्या अडचणी, घरात कुटुंब सदस्य संख्या अधिक असल्याने अडचणी, अशातच घरातील व्यक्तीला कोरोना लक्षणे, संशयित, अथवा बाधित रुग्ण होण्याची शक्यता आहे.

या कारणस्तव विलगिकरणाच्या सुविधेकरिता, रुग्णनाच्या उपचारार्थ कुटुंबातील इतरांना संसर्ग होऊ नये याकरिता व एकूणच सुरक्षा व अशा परिसरातील नागरिकांची स्वतंत्र रित्या व तात्पुरत्या स्वरूपाच्या निवासस्थानाची उपाययोजनेतर्गत व्यवस्था करणे निकडीचे आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी मनपाच्या संबंधित विभागांना आदेश दिले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.