Pune : विधानसभा निवडणुकीत भाजप-सेनेचा फायदा, आदित्य ठाकरे यांचा उदय- ज्योतिषी सिध्देश्वर मारटकर

'महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे भाकित' या विषयावर ज्योतिषांचा परिसंवाद

एमपीसी न्यूज- विधानसभा निवडणुकीत भाजप -सेनेचा फायदा होईल, आदित्य ठाकरे यांचा उदय होईल, आक्रमकतेने शरद पवार यांची स्थिती सुधारणार तर, राहुल गांधी -राज ठाकरे यांची स्थिती ‘जैसे थे’ राहील, असे भाकित ज्योतिषी सिध्देश्वर मारटकर यांनी वर्तवले. ‘महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे भाकित’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन ‘ज्योतिष ज्ञान दिवाळी अंक प्रकाशन ‘समारंभाच्या निमित्ताने 13 ऑक्टोबर रोजी करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्तनी अभ्यासक, लेखक वा. ल. मंजुळ व प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती प्रतिभा शाहू मोडक उपस्थित होत्या. या प्रसंगी नवीन वर्ष कसे राहिल तसेच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे भाकित या विषयांवर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादात वक्ते म्हणून
ज्योतिष विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश्वर मारटकर, विजय जकातदार व जयश्री बेलसरे हे सहभागी झाले.

प्रतिभा मोडक म्हणाल्या,”कौटुंबिक , सामाजिक सल्ल्यासाठी ज्योतिषाची आवश्यकता असते. पाच वर्षात ज्योतिषाची गरज भासली नाही तरी निवडणूक काळात ही आवश्यकता जरा वाढते. परमेश्वरावर श्रद्धा ठेवून भविष्यवाणी करावी, आणि वाचासिद्धीचा अनुभव घ्यावा”

सिद्धेश्वर मारटकर म्हणाले, ” सत्ताधारी पक्षाच्या पत्रिकेतील दशम स्थान, रवी पाहून, विरोधी पक्षाच्या पत्रिकेतील चौथे स्थान पाहून भविष्य सांगितले जाते. रवी बिघडला की संक्रमण होते, असा अनुभव आहे. गुरु ग्रह नोव्हेंबरमध्ये धनू राशीत येत असल्याने भाजपला फायदा मिळेल. हर्षल ग्रह युतीला जास्तीत जास्त जागा मिळवून देईल. लोकसभेप्रमाणेच मित्रपक्षांच्या मदतीने मोठे यश मिळेल. आदित्य ठाकरेंचा उदय हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरेल. त्यांच्या मकर राशीत शनी, राहू, चंद्र आल्याने घबाड मिळू शकते. घराण्यातील नातेसंबंधांना, पितापुत्रांना, नव्या पिढीला चांगले दिवस आहेत. सिंह राशीचा चंद्र देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद देईल”

मारटकर पुढे म्हणाले, ” काँग्रेसच्या थोरात यांच्या राशीत चुकीच्या काळात नेतृत्व झाले. राज ठाकरे, राहुल गांधी यांची परिस्थिती ‘जैसे थे ‘राहील. शरद पवार यांच्या राशीत रवीवरून गुरुचे भ्रमण असल्याने आक्रमकता वाढली आहे, ती काही जागा जास्त देऊन जाईल. सप्टेबर २०२० नंतर अर्थव्यवस्था सुधारेल.नवीन वर्षात युद्धजन्य परिस्थिती, कडक उन्हाळा,तीव्र पावसाळा येवू शकते”

जयश्री बेलसरे म्हणाल्या , “पंतप्रधान मोदी यांना त्यांच्या राशीची फळे मिळत आहेत. ती पुढेही मिळत राहतील. वा.ल.मंजूळ म्हणाले, ” राजकारणात अस्थिरता आहे. त्यावर भविष्यवाणी वर्तवणे अवघड असते. पण, मारटकर यांनी हे शिवधनुष्य पेलले आहे.अस्थिर जीवनात ज्योतिषाचे मार्ग दर्शन दिलासा देऊन जाते. चंद्रशेखर बिडवाई, पल्लवी जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.