Pune: विधानसभा निवडणुकीमुळे काँगेस-राष्ट्रवादीला संजीवनी ; मोदी लाट ओसरत असल्याचे स्पष्ट

एमपीसी न्यूज – 2014 मध्ये मोदी लाटेत पुणे शहरातील सर्वच्या सर्व आठ मतदारसंघात भाजपचे तब्बल 8 आमदार निवडून आले होते. त्यानंतर झालेल्या पुणे महापालिका निवडणुकीत भाजपचे 98 नगरसेवक निवडून आले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांनी सव्वातीन लाख मतांनी विजय मिळविला होता. त्यामुळे शहरात मोदी लाट कायम असल्याचे भाजपतर्फे सांगण्यात येत होते. मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने मुसंडी मारत दोन मतदारसंघावर ताबा मिळवला. त्यामुळे २०१९ ची निवडणूक काँगेस -राष्ट्रवादीला संजीवनी देणारी ठरली तर मोदी लाट ओसरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आमचे आठही उमेदवार विजयी होणार, काँगेस – राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे ‘डिपॉझिट’ही वाचणार नाही, असा अतिआत्मविश्वास भाजपचे नेते मंडळी निकालापूर्वी व्यक्त करीत होते. मात्र या निवडणुकीत हडपसर आणि वडगावशेरी मतदारसंघात भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला. त्याचप्रमाणे उर्वरित मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांचे मताधिक्य घटल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे 2019 चा निकाल हा भाजपला चिंतन करायला लावणारा आहे.

खडकवासला मतदारसंघात आमदार भीमराव तापकीर यांना केवळ 2500 मतांनी विजय मिळविता आला. राष्ट्रवादीचे नगरसेवक सचिन दोडके यांनी तापकीर यांच्या तोंडाला फेस येईपर्यंत पळविले. कोथरूड मतदारसंघात काँगेस – राष्ट्रवादी – मनसे असा नवा पॅटर्न उदयास आला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा केवळ 25 हजार मातांनी विजय झाला. 1 लाख 60 हजार मतांनी विजयी होणार असल्याच्या वल्गनाच ठरल्या. पर्वती मतदारसंघात भाजपच्या शहराध्यक्ष माधुरी मिसाळ यांचे मताधिक्य घटले आहे. त्यांचा केवळ 37 हजार मतांनी विजय झाला.

शिवाजीनगरमध्ये सिद्धार्थ शिरोळे यांना काँगेसचे माजी नगरसेवक दत्ता बहिरट यांनी चांगली फाईट दिली. पण, अखेर शिरोळे यांनी संपूर्ण मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांची नाराजी दूर केली. त्यामुळे त्यांना हा विजय प्राप्त करता आला. पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघांत भाजपचे उमेदवार सुनील कांबळे यांच्या समोर काँगेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी मोठे आव्हान उभे केले होते. पण, वंचितच्या लक्ष्मण आरडे यांची 10 हजार तर, मनसेच्या उमेदवार हिना मोमीन यांची 5 हजार अशी 15 हजार मते विभागली गेली. त्याचा फटका बागवे यांना बसला. कांबळे यांचा केवळ 5 हजार मतांनी विजय झाला.

वडगावशेरी आणि हडपसर हे दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादीने भाजपचा तावडीतून खेचून घेतले. त्यामुळे ही निवडणूक काँग्रेस – राष्ट्रवादीला संजीवनी देणारी ठरली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उमेद्वारांच्या विजयासाठी सभा घेतल्या. पण, त्यांचे उमेदवार पराभूत झाले. कसबापेठ मतदारसंघात महापौर मुक्ता टिळक यांचा 28 हजार मतांनी विजय झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.