Pune : उद्या निकाल ! उमेदवारांची धाकधूक वाढली !

एमपीसी न्यूज – विधानसभा निवडणुकीचा उद्या गुरुवारी (दि. 24) निकाल लागणार आहे. सोमवारी 21 तारखेला मतदान झाल्यापासून उमेदवारांच्या डोळ्यांची झोपच उडाली आहे. यावेळी पुणे शहरात भाजप आठही जागांवर विजय मिळवण्याची शक्यता कमी असून एक ते दोन जागांवर भाजपला पराभवाचा सामना करावा लागणार असल्याची चर्चा आहे.

हडपसर, खडकवासला, वडगावशेरी किंवा पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात आघाडी किंवा मनसे खाते उघडण्याच्या स्थितीत आहे. कोथरूडमध्येही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मनसेचे किशोर शिंदे यांनी तगडे आव्हान दिले आहे. पाटील हे राज्यातील क्रमांक 2 चे नेते आहेत. त्यांना निवडून आणण्याची विशेष जबाबदारी खासदार गिरीश बापट यांच्यावर टाकण्यात आली होती. बापट यांनीही भाजप नगरसेवकांना चांगलेच पळविले.

कसबा मतदारसंघांत महापौर मुक्ता टिळक या 50 हजार मतांनी विजयी होणार असल्याचा अंदाज बापट यांनी व्यक्त केला आहे. तर, 1 लाख 60 हजार मतांनी आपण विजयी होणार असल्याचा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

खडकवासला मतदारसंघांत राष्ट्रवादीचे नगरसेवक सचिन दोडके यांनी ठिकठिकाणी फ्लेक्स लावून आपणच विजयी होणार असल्याचा दावा केला आहे. तर, दोडके यांना अतिआत्मविश्वास असून, भाजपचे भीमराव तापकीर विजयी होणार असल्याचा कार्यकर्त्यांना विश्वास आहे. वडगावशेरी मतदारसंघांत राष्ट्रवादीचे नगरसेवक सुनील टिंगरे यांनी आमदार जगदीश मुळीक यांना चांगली टक्कर दिल्याची चर्चा आहे. माजी आमदार बापूसाहेब पठारे यांच्या भाजप प्रवेशाचा मुळीक यांना फायदा होणार असल्याचे सांगण्यात येते.

शिवाजीनागरमध्ये माजी उपमहापौर मुकारी अलगुडे यांनी ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश केला. त्याचा फायदा सिद्धार्थ शिरोळे यांना होऊ शकतो. या मतदारसंघात सिद्धार्थ शिरोळे आणि काँगेसचे दत्ता बहिरट यांच्यात थेट लढत आहे. पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघांत स्थायी समितीचे माजी अध्यक्ष सदानंद शेट्टी यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे काँगेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांना हा झटका मानला जात आहे. या मतदारसंघात स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे यांना बागवे यांनी चांगलीच टक्कर दिली. हडपसर मतदारसंघांत भाजपचे योगेश टिळेकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे आणि मनसेचे वसंत मोरे असा तिहेरी सामना आहे. त्यात कोण बाजी मारणार, हे उद्या स्पष्ट होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.