Pune : शिवाजीनगर मतदारसंघात निनावी फ्लेक्समधून आमदार, खासदार यांच्यावर निशाणा

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर

एमपीसी न्यूज- सध्या शिवाजीनगर मतदारसंघात निनावी फ्लेक्स झळकत असून या फ्लेक्सच्या माध्यमातून विद्यमान आमदार, खासदार यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा फ्लेक्स सर्वांचे लक्ष वेधून घेत असून मतदारसंघात चर्चा रंगली आहे.

या मतदारसंघात विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी तब्बल 31 जण इच्छुक आहेत. विद्यमान आमदार विजय काळे यांच्या विरोधात भाजप इच्छुकांनीच उघडपणे बंड पुकारले आहे. काळे यांचा अहवाल प्रकाशनावेळी ही नाराजी दिसून आली होती.

‘विद्यमान आमदार झोपा काढतोय’ अशा शब्दात, आमदार विजय काळे यांच्यावर निशाणा साधलाय तर विद्यमान खासदार ‘पीए’ साठी लढतोय असे टोमणे हाणून खासदार गिरीश बापट यांचावर टीका करण्यात आली आहे. एकेकाळी बापट यांचे ‘पीए’ म्हणून राहिलेल्या सुनील माने यांनी रीतसर भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना शिवाजीनगर मतदारसंघातून उमेदवारी मिळावी म्हणून बापट यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

दुसरीकडे कसबा विधानसभा मतदारसंघातून बापट यांचा स्नुषा स्वरदा बापट यांनाच उमेदवारी मिळविण्यासाठी गिरीश बापट यांनी ‘जीवाचा आटापिटा’ सुरू केला आहे. कसबा मतदारसंघात महापौर मुक्ता टिळक, स्वीकृत नगरसेवक गणेश बिडकर, नगरसेवक धीरज घाटे, हेमंत रसाने प्रबळ इच्छुक आहेत. कोथरुड मतदारसंघातून विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांच्यासमोर स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी आव्हान उभे केले आहे. खासदारकीचे तिकीट कापतेवेळी अनिल शिरोळे यांना मुलाला विधानसभेची उमेदवारी देणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते, अशी चर्चा आहे.

त्यामुळेच सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी मिळावी, म्हणून वरिष्ठांकडे पाठपुरावा सुरू आहे. मग अशी परिस्थिती असतांना कार्यकर्त्यांचे काय? आम्हाला संधी कधी मिळणार? असा सवाल निनावी फ्लेक्समधून उपस्थित करण्यात आला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.