Pune : वंचित बहुजन आघाडीचा काँगेस – राष्ट्रवादीच्या तीन उमेदवारांना फटका

काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, नगरसेवक सचिन दोडके, माजी नगरसेवक दत्ता बहिरट यांचा धक्कादायकरित्या पराभव

एमपीसी न्यूज – वंचित बहुजन आघाडीचा काँगेस – राष्ट्रवादीच्या तीन उमेदवारांना फटका बसला. पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांना, शिवाजीनगरमध्ये काँग्रेसचे माजी नगरसेवक दत्ता बहिरट यांना, तर खडकवासला मतदारसंघांत राष्ट्रवादीचे नगरसेवक सचिन दोडके यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. काँग्रेस – राष्ट्रवादी महाआघाडीत वंचित आघाडी सहभागी झाली असती तर या उमेदवारांचा पराभव रोखता आल्याचे बोलले जात आहे.

खडकवासला मतदारसंघात वंचितचे अप्पा आखाडे यांना 5 हजारपेक्षा जास्त मते मिळाली तर, सचिन दोडके यांचा केवळ 2300 मतांनी पराभव झाला. शिवाजीनगर मतदारसंघात वंचितचे अनिल कुऱ्हाडे यांना 16 व्या फेरी अखेर 10 हजार 454 मते मिळाली. त्यांना बोपोडी, वडारवाडी भागांत चांगली मते मिळाली. तर, पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात वंचितचे लक्ष्मण आरडे यांनी तब्बल 10 हजार 26 मतदान घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शिवाय ‘एमआयएम’च्या उमेदवार हिना मोमीन यांना 6 हजार 152 मते मिळाली. या तिन्ही मतदारसंघांत वंचितचे मत विभाजन टाळले गेले असते तर काँगेस – राष्ट्रवादीच्या 3 उमेदवारांचा पराभव टाळता आला असता.

वसंत मोरे ‘बाजीगर’

हडपसर मतदारसंघात भाजपचे योगेश टिळेकर यांचा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी पराभव केला, असला तरी खरे ‘बाजीगर’ मनसेचे उमेदवार वसंत मोरे ठरले. त्यांनी तब्बल 34 हजार मते मिळविली. त्यामुळे तुपे यांचा विजय सोपा झाला. मोरे यांनी मागील 3 ते 4 वर्षांपासून टिळेकर यांच्या भ्रष्टाचार विरोधात हल्लाबोल केला होता.

चंद्रकांत पाटील यांचे लीड कमी

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे तब्बल 1 लाख 60 हजार मतांनी विजयी होणार असल्याचा अतिआत्मविश्वास भाजपचे नगरसेवक व्यक्त करीत होते. पण, पाटील यांनी जेमतेम 25 हजार मतांनी विजय मिळविला. त्यामुळे कोणी कोणी पाटील यांचे काम केले नाही, याचा शोध घेणे गरजेचे आहे. मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांनी त्यांच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या भरवशावर पाटील यांना जोरदार लढत दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.