Pune: ससून रुग्णालयात मेडिकल गॅस पाईपलाईनचे काम विक्रमी 11 दिवसांत पूर्ण

जागतिक विक्रम असल्याचा अॅटलास कॉप्कोचा दावा

एमपीसी न्यूज – पुण्याच्या ससून रुग्णालयाच्या नव्या इमारतीत कोरोनाबाधित रुग्णासाठी सुरू करण्यात येत असलेल्या अतिदक्षता विभागासाठी मेडिकल गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम पिंपरी-चिंचवडच्या अॅटलास कॉप्को कंपनीने अवघ्या 11 दिवसांत पूर्ण केले आहे. त्यामुळे कोरोनाचे हे विशेष रुग्णालय उद्यापासून (सोमवार) रुग्णसेवेसाठी सज्ज होऊ शकले आहे. हा जागतिक विक्रम असल्याचा दावा कंपनीच्या वतीने करण्यात आला आहे. 

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी एका ट्वीटद्वारे ही माहिती दिली. पुण्याच्या ससून रुग्णालयाच्या आवारात उभारलेल्या नव्या इमारतीत कोरोनाचे विशेष रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यानंतर त्यासाठी आवश्यक कामांची पूर्तता करून घेण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खात्याने स्वीकारली. अत्यंत कमी वेळात मेडिकल गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम खूप आव्हानात्मक होते. त्याची जबाबदारी अॅटलास कॉप्को कंपनीवर सोपवली होती. ती कंपनीच्या अभियंत्यांनी यशस्वीपणे पूर्ण केली.

द्रवरूपी ऑक्सिजनचे वायूत रूपांतर करून पुरवठा करण्याच्या या  कामाला निविदा काढण्यापासून प्रत्यक्ष काम पूर्ण होईपर्यंत साधारणतः पाच ते सहा महिने लागले असते. पण सार्वजनिक बांधकाम विभागाने रात्रंदिवस एक करून हे काम पूर्ण करून घेतले. अधिकारी, कर्मचारी व सर्व संबंधितांचे मनःपूर्वक अभिनंदन, असे चव्हाण यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.