Pune : नियम धाब्यावर बसवून मर्जितल्या संस्थांना काम ; अविनाश बागवे यांचा आरोप

एमपीसी न्यूज- महापालिकेचे उपायुक्त आणि नगरसेवकाच्या नातेवाईकाचा समावेश असलेल्या सत्यम कन्सल्टंट या तांत्रिक सल्लागार संस्थेला पाच कोटी रुपयांपर्यंतच्या विकासकामांचे थर्ड पार्टी ऑडीटचे काम मिळावे यासाठी प्रशासनाकडून या संस्थेसाठी अनेक त्रुटी डावलून नियम धाब्यावर बसून काम देण्याचा घाट घातल्याचा आरोप नगरसेवक अविनाश बागवे यांनी पत्रकार परिषदेत केला.

नगरसवेक अविनाश बागवे यांनी सांगितले, की महापालिकेच्या वतीने करण्यात येणार्‍या पाच कोटी रुपयांपर्यंतच्या विकासकामांचा प्रामुख्याने छोटे पूल, कल्व्हर्ट, रस्त्यांचे थर्ड पार्टी ऑडीट करण्यासाठी पालिकेने निविदा मागविली होती. त्यामध्ये सत्यम कन्सल्टंट या संस्थेची निविदा सर्वात कमी दराची आल्याने पाच महिन्यांपूर्वी ती स्थायी समितीपुढे मान्यतेसाठी ठेवण्यात आली होती. त्यावेळी या कंपनीने सादर केलेले आयकर रिटर्न, कर्मचार्‍यांचा प्रॉव्हीडंड फंड, अनुभव दाखला, संचालक यादी ही आक्षेपार्ह असल्याचे निदर्शनास आले होते. तसेच एकच कंपनी असताना दोन पॅन नंबर असल्याचे मी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. परंतु प्रशासनाकडून यावर फार काही स्पष्टीकरण मिळाले नाही आणि स्थायी समितीत ठराव मंजूर झाला.

या संदर्भात सर्वसाधारण सभेतही प्रश्‍न उपस्थित करण्यात आले. त्यावर खुलासा करताना पथविभागाने संबधित फाईल गहाळ झाली असून अज्ञात व्यक्तिविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे लेखी उत्तर दिले. परंतु पथ विभागाच्या कनिष्ठ अभियंता स्नेहा वाघचौरे यांनी ही फाईल पथ विभागाच्या बारनिशीतून सत्यम कन्सल्टंटच्या प्रतिनिधीने परस्पर नेल्याचे पत्र वरिष्ठांना दिले होते. बारनिशितून परस्पर फाईल नेल्याप्रकरणी सत्यम कन्सल्टंटच्या संबधित व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्याऐवजी अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या संस्थेचे संचालक हे महापालिकेचे एक वरिष्ठ अधिकारी आणि नगरसेवकाचे नातेवाईक असल्याचे समजते. केवळ त्यांच्या दबावामुळेच हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला आहे.

यासंदर्भात महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेउन निवेदन दिले. सत्यम कन्सल्टंट कंपनीविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा तसेच त्यांना या कामी मदत करणार्‍या दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. आयुक्तांनी याप्रकरणी सत्यम कंपनीने मिळविलेला आयकर दाखला व इतर कागदपत्रांची तपासणी करण्यात येईल. याप्रकरणाची सखोल चौकशी करून संबधितांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्‍वासन आयुक्तांनी दिल्याचे बागवे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.