Pune: एकपात्रीद्वारे कोरोनाबाबत जनजागृती आणि सामाजिक संदेश  

एमपीसी न्यूज – ‘कोरोनाच्या लढाईत माझेही योगदान’ या उपक्रमाद्वारे एकपात्री कलाकार आणि सिनेअभिनेता संतोष चोरडिया हे एकपात्री कलेच्या माध्यमातून मनोरंजन करत लोकांमधील सकारात्मकता वाढवत आहेत.  समाज माध्यमांचा कलात्मकपणे उपयोग करून घेत आहेत. माध्यमांचा उपयोग मनोरंजनापुरता सीमित न ठेवता, कोरोनाबाबत जनजागृती आणि सामाजिक संदेशही ते देत आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फेसबुक लाईव्ह आणि विविध व्हिडिओंद्वारे सुप्रसिद्ध अभिनेत्यांच्या गाजलेल्या संवादातून जसे राजेश खन्ना यांचा   ‘रो मत पुष्पा री ‘ असेल किंवा  अमिताभ बच्चन यांचा ‘ दिवार’ मधील   ‘ आज खुश तो बहुत होंगे तुम ‘  हा संवाद असेल तो वेशभूषेतून तसेच आवाजातूनही संतोष चोरडिया जनजागृती करत आहेत. तसेच ‘होठोंपे सच्चाई रहती है, हम ऊस देश के वासी है जिस देश में गंगा बहती है’ या गाण्यातून समाजातील सर्व घटकांची कोरोना विरुद्धच्या लढाईत एकजूट किती महत्त्वाची आणि गरजेची आहे हे सांगत आहेत.

माणसाने माणूसकी जपत एकमेकांना सहकार्य करावे यासाठी  ‘ किसी की  मुस्कुराहटोपे हो निसार, किसीका दर्द मिल सके तो ले ऊधार , जीना इसीका नाम है ” या गाण्यातून  ते प्रभावीपणे मार्गदर्शन करीत आहेत. त्यांच्या या उपक्रमाचे देश, विदेशातून कौतुक होत आहे.  सगळीकडे नकारात्मक आणि तणावाचे वातावरण असताना आयुष्यातले काही क्षण या कार्यक्रमांमुळे निश्चितच आनंदाचे अनुभवायला मिळत आहेत, अशा प्रतिक्रिया रसिकांनी नोंदविल्या आहेत.

कोरोना विरुद्धच्या लढाईत आपलेही योगदान असावे, या उद्दात हेतूने आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हा उपक्रम सुरू केला असल्याचे संतोष चोरडिया यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.