Pune : ‘मी देखील अयोध्येला जाणार’ ; रामदास आठवले यांची पत्रकार परिषदेत माहित

एमपीसी न्यूज : “उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराचा मुद्दा उचलून धरत अयोध्यावारी केली आहे. त्यांना तेथे चांगला प्रतिसाद मिळाला आहे. राम मंदिरासाठी त्यांचा प्रयत्न सुरु आहे, ही बाबा चांगली असली, तरी राम मंदिरासाठी अध्यादेश काढण्यासाठी आग्रही राहू नये. हा वाद सामोपचाराने सोडवण्यासाठी तेथे एखादी संस्था उभारावी, जेणेकरून कोणत्याही समाजाच्या भावना दुखावणार नाहीत. अयोध्यामधील काही व्यक्तीकडून तिथे येण्याचे निमंत्रण मिळाले असून मीदेखील लवकरच अयोध्येला जाणार आहे,” अशी माहिती केंद्रीय समाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष गंगाधर आंबेडकर, राष्ट्रीय सचिव एम. डी. शेवाळे, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, महाराष्ट्र सचिव बाळासाहेब जानराव, पश्चिम आघाडी सचिव परशुराम वाडेकर, कामगार आघाडीचे अध्यक्ष महेश शिंदे, शहराध्यक्ष अशोक कांबळे, शहर संपर्कप्रमुख अशोक शिरोळे, शहर सचिव महिपाल वाघमारे आदी उपस्थित होते.

रामदास आठवले म्हणाले, “राम मंदिर प्रश्नावर तेथील हिंदू आणि मुस्लिम नागरिकांशी त्या ठिकाणी जाऊन संवाद साधून हा वाद सामोपचाराने मिटवण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच राम मंदिराला आमचा विरोध नसून, ते बेकायदेशीररित्या उभारण्याचा कुणीही प्रयत्न करू नये. कारण सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जानेवारीमध्ये येणार आहे. त्यामुळे राम मंदिर बांधू इच्छणार्‍यानी काही काळ शांत रहावे. चर्चा करून तेथील काही जागा हिंदूंना, तर काही जागा मुस्लिम समाजासाठी द्यावी. उर्वरित बुद्ध विहार बांधण्यासाठी द्यावी.”
“भीमा कोरेगाव प्रकरणाशी एल्गार परिषदेचा संबध नाही, हे मी वारंवार सांगत आहे. पोलीस तपासात म्हणताहेत की संभाजी भिडेंविरुद्ध पुरावा नाही. त्यामुळे त्याचा पुन्हा कसून तपास व्हायला हवा. ती दंगल पूर्वनियोजित होती. या प्रकरणी राज्य सरकारकडून नेमण्यात आलेल्या आयोगामार्फत लवकरच माहिती पुढे येईल. यावर्षी भीमा कोरेगाव येथे अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाला आवश्यक त्या सूचना देण्यात येणार आहेत,” असेही आठवले यांनी नमूद केले.
येणाऱ्या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्ष भारतीय जनता पक्षासोबतच असणार आहे. कारण पुढील किमान पंधरा वर्षे मोदींची हवा असणार आहे. त्यानंतर हवेचा प्रवाह पाहून निर्णय घेऊ. सद्यस्थितीत जिकडे आठवले असतील, तिकडे हवा असेल, अशा खुमासदार शैलीत त्यांनी राजकीय भूमिकेबाबत उत्तर दिले. पाचही राज्यात होत असलेल्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळेल. तसेच रिपब्लिकन पक्षही काही जागा लढवत असून, आमचे आमदार निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.