Pune : भगवद्गीतेचा अवमान करणा-या ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ चित्रपटावर बंदी घाला

माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांची जिल्हाधिका-यांकडे मागणी

एमपीसी न्यूज – आगामी 24 मे रोजी प्रदर्शित होत असलेल्या ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ या चित्रपटात श्रीमद भगवद्गीतेचा अवमान करणारा संदर्भ आला आहे. गीतेतील एका श्लोकाचा संदर्भ एक आतंकवादी देत असल्याचे चित्रण करण्यात आले आहे. या चित्रीकरणामुळे भारतातील हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. यामुळे या चित्रपटावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे केली.

माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी याबाबत जिल्हाधिका-यांना निवेदन दिले.

  • या निवेदनात म्हटले आहे की, ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. हा चित्रपट येत्या 24 मे रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. मायरा खान यांनी चित्रपटाची निर्मिती तर, राजकुमार गुप्ता यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन व निर्मिती केली आहे. ट्रेलरमध्ये एक पाकिस्तान आतंकवादी भगवद्गीतेच्या श्लोकाचा आधार घेऊन संवाद साधत आहे. भारतातील विविध शहरांमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात जे लोक मरण पावले, ते मेले नसून त्यांच्या आत्म्याला एका शरीरातून दुस-या शरीरात पाठवल्याचे तो आतंकवादी सांगत आहे. आतंकवाद्यांच्या तोंडी गीतेचे तत्त्वज्ञान देणे हा विरोधाभास आहे. यामुळे हिंदू जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, “बॉलिवूडमध्ये सतत अशा प्रकारचे हिंदुविरोधी चित्रण वारंवार केले जात आहे. हिंदू धर्मात आदय ग्रंथ समजला जाणारा ग्रंथ म्हणजे श्रीमद भगवद्गीता आहे. या ग्रंथात नित्यनियम तसेच हिंदू धर्माचे तत्वज्ञान सांगितले आहे. मन आणि बुद्धीच्या वादात सापडलेल्या व्यक्तींना भगवान श्रीकृष्णाने स्वतःच्या तत्वज्ञानाने मार्ग दाखविला आहे. या ग्रंथात आत्मा अमर आहे, असे तत्वज्ञान दुसऱ्या अध्यायातील बाराव्या श्लोकात लिहिलेले आहे. या श्लोकाचा दुरुपयोग ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ या चित्रपटात करण्यात आले आहे. गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला मार्गदर्शन करत होते, तेव्हा त्यांनी वाईट कृत्याचा व वाईट कृत्य करणा-यांचा नाश करावा, असे सांगितले आहे. परंतु चित्रपटात हिंदू धर्माला व हिंदू ग्रंथाला चुकीच्या पद्धतीने दर्शविले आहे. कोणताही आतंकवाद हिंदू धर्मात लिहिलेला नाही व हिंदू आतंकवादी नाहीत.

  • पाकिस्तानातील आतंकवादाच्या तोंडातून आलेले भगवद्गीतेचे श्लोक या चित्रपटातून काढून टाकावेत. सेन्सर बोर्डाने या पुढे हिंदू धर्माविषयी वाक्य किंवा वाईट कृत्य करणारे चित्रपट प्रदर्शित करू नये. निर्माते राजकुमार गुप्ता आणि माहिरा खान यांनी हिंदूंची मने दुखावली असल्याने त्यांच्यावर चित्रपट प्रदर्शित करण्याची कायमस्वरूपी बंदी आणावी, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.