Pune: गर्दी टाळण्यासाठी पुण्यात 31 मार्चपर्यंत वाहतूक बंदी

एमपीसी न्यूज – वारंवार सांगूनही लोक ऐकत नसल्याने गर्दी टाळण्यासाठी पुणे शहरातील रस्त्यांवर 31 मार्चपर्यंत वाहतूक बंदी करण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे. केरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गर्दी टाळण्याच्या उद्देशाने आज (सोमवारी) संध्याकाळपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

 

या वाहतूक बंदीतून केवळ अत्यावश्यक सेवांसाठी वापरली जाणारी वाहने वगळण्यात आली आहेत.

 

जनता संचारबंदीला स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद देणाऱ्या पुणेकरांनी संचारबंदीची मुदत संपल्यानंतर मात्र आपापल्या वाहनांसह रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. त्यामुळे शहरात रस्त्यांवर ठिकठिकाणी अनावश्यक गर्दी पाहायला मिळत आहे. राज्यात मुख्यमंत्र्यांनी 31 पर्यंत लॉकआऊटची घोषणा आहे. अत्यावश्यक सेवेतील अधिकारी व कर्मचारी वगळता कोणीही घराबाहेर पडू नये, असे वारंवार आवाहन करून देखील लोक ऐकत नसल्याचे दिसून येत आहे. जमावबंदी आदेश लागू करूनही विविध कारणे पुढे करून लोक वाहनांसह रस्त्यांवर येतच आहेत. त्यासाठी आता रस्त्यांवर वाहने आणण्यास बंदी घालण्याच्या निर्णय पोलिसांनी घेतला आहे.

 

शहरातील प्रमुख रस्ते लोखंडी बॅरिकेड्स लावण्यात येत असून ठोस कारण नसताना वाहने रस्त्यावर आणणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची तयारी पोलिसांनी केली आहे. कामावर गेलेल्या नागरिकांना घरी जाता यावे, म्हणून संध्याकाळपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.