Nigdi: मोबाईल, इंटरनेट वापरताना विद्यार्थिनींनी काळजी घ्यावी – प्रकाश मुत्याळ

एमपीसी न्यूज – विद्यार्थिनींनी उपलब्ध असलेल्या समाज माध्यमांचा, तसेच मोबाईल व इंटरनेट या साधनांचा वापर करताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन पिंपरी-चिंचवडचे पोलीस सहआयुक्त प्रकाश मुत्याळ यांनी केले. 

कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे डॉ. अरविंद ब. तेलंग वरिष्ठ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभाग व विमेन हेल्पलाईन फाउंडेशन यांच्या संयुक्‍त विद्यमाने ‘सायबर क्राईम व महिला सुरक्षा’ या विषयावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुत्याळ बोलत होते. त्यावेळी निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे,  सायबर क्राईम विभागाचे पोलीस निरीक्षक सुधाकर काटे, विमेन हेल्पलाईन फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता परदेशी, कार्याध्यक्ष अनिता सोनवणे व अॅड. सौ. सारिका परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

मुत्याळ म्हणाले की, विद्यार्थी, विद्यार्थिनींनी अभ्यासासाठी व सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी समाज माध्यमे, मोबाईल, इंटरनेट आदी साधनांचा जरूर वापर करावा. विविध उदाहरणांच्या माध्यमातून कायदयातील विविध कलमांबाबतही त्यानी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले.

घ्यावयाच्या खबरदारीबद्दल बोलताना मुत्याळसाहेब म्हणाले की, मुलींनी कुठलीही गोष्ट करण्यापूर्वी व कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्याची चर्चा आपले आई-वडील व शिक्षक यांच्याशी प्रथम करावी. सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कायद्याचे ज्ञान असणे ही आजच्या काळाजी गरज आहे, असेही त्यांनी सूचित केले. साइबर क्राईमबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सुधाकर काटे म्हणाले की, आपली वैयक्तिक माहिती, वैयक्तिक छायाचित्रे, आपले लोकेशन, ओटीपी कोणशीही ‘शेअर’ करू नयेत.

नीता परदेशी यांनी विद्यार्थीनींनी स्वत:ची काळजी कशी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश पाटील हे म्हणाले की ‘अभ्यास’ हा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यांनी उपलब्ध समाजमाध्यमांचा वापर स्वत:च्या भवितव्याच्या जडणघडणीसाठी होईल, याची खबरदारी घ्यावी. आई-वडील आणि शिक्षक हे विद्यार्थ्याच्या मार्गदर्शनासाठी सदैव तत्पर असतात. फक्त त्यानी त्याचा उपयोग करून घेणे ही काळाची गरज आहे.

महाविद्यालयाचे समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. विकास शेवाळे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. जयश्री डंके व वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. डी. एम. खुने तसेच महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष श्रम घेतले. प्रा. सौ. गौरी खेडकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व डॉ. शिवाजी शेळके यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रपासाठी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.