Pune : ‘महाराष्ट्राची सौंदर्य सम्राज्ञी’ राज्यस्तरीय स्पर्धेची अंतिमफेरी 19 फेब्रुवारीला

स्पर्धेत दिव्यांगांसाठी व्यासपीठ

एमपीसी न्यूज- एऑन इवेंट्स व आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राची सौंदर्य सम्राज्ञी ही राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली असून स्पर्धेचा अंतिम सोहळा दि. 19 फेब्रुवारी रोजी कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात​ सायं. 5 वा. पार पडणार असल्याची माहिती आयोजिका सोनम पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या स्पर्धेसाठी विवाहित आणि अविवाहित असे दोन गट तसेच 18 वर्षे पूर्ण ही अट होती. राज्याच्या विविध शहरांमधुन या स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळाला. मुंबई, रायगड, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, नाशिक, सातारा, नागपूर आणि पुणे या ठिकाणी झालेल्या प्राथमिक फेरीतून निवड झालेले स्पर्धक पुण्यात होणाऱ्या अंतिम फेरीत​ सहभागी होणार असल्याचे सोनम पाटील यांनी सांगितले. हा अंतिम सोहळा सर्वांसाठी खुला असून विनामूल्य असल्याचेही त्यांनी नमूद केले.

राज्यभरातून आलेल्या प्रवेशिकेतून विवाहित आणि अविवाहित गटांमधून प्रत्येकी तीस असे 60 स्पर्धक अंतिम फेरीसाठी पात्र ठरले असून त्यांची अंतिम फेरीसाठीची पूर्वतयारी (ग्रुमिंग) आयोजकांकडून करून घेतली जाणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून विविध प्रकारातील दिव्यांगांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. नृत्य, गायन तसेच विविध कला सादरीकरणासाठी राज्यभरातील दिव्यांगांच्या 12 संस्थांनी / शाळांनी यामध्ये सहभाग नोंदवला असून हे सर्वजण पुण्यात होणाऱ्या अंतिम फेरीसाठी सज्ज झाले आहेत.

दि. 18 फेब्रुवारी रोजी जांभुळवाडी येथे अंतिम फेरीतील स्पर्धकांना प्रोत्साहित करण्यासाठी लेखक आणि सुलेखनकार सुनील कुरणे यांचे ‘स्त्रीसत्व’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे तसेच विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार कलाकार देवदत्त नागे (जय मल्हार फेम) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. दिव्यांग व्यक्तींनी केलेला रॅम्पवॉक या सोहळ्याचे विशेष आकर्षण असेल असे पाटील यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.