BNR-HDR-TOP-Mobile

Pune : जर्मन कथक नृत्यांगनांच्या पदन्यासाला उत्स्फूर्त दाद!

एमपीसी न्यूज – परदेशी नृत्यांगनाचा भारतीय परंपरेने सादर झालेला कार्यक्रम नुकताच रसिकांना अनुभवता आला. या कथक नृत्याविष्काराद्वारे शिवस्तुती, गुरुवंदना, ‘कथक’चे खास वैशिष्ट्य असलेला नृत्याविष्कार समग्र तीन तालात पेश केला गेला. कथकमध्ये अभावानेच बघायला मिळणाऱ्या बैठकीच्या अभिनयामध्ये ‘वर्षा ऋतू’ हे विरह गीत सादर करण्यात आले. सरगम, तरणा, गीत आणि नटवरी या चार रंगांनी नटलेला ‘चतरंग’ नृत्य आविष्कारही यावेळी झाला. मैफलीची सांगता गणेशस्तुतीने करताना नांदीच करण्यात आली.

गुरु रोहिणी भाटे आणि त्यांच्या ज्येष्ठ शिष्य नीलिमा अध्ये यांच्याकडे ‘कथक’ची तालीम घेतलेल्या जर्मन कथक नृत्यांगना कॅरोलिन डॅसेल आणि त्यांची शिष्या तान्जा प्रेड यांच्या कथक नृत्याविष्काराची ‘धन्य’ या मैफलीस जाणकार रसिकांची दाद मिळाली. येथील प्रकृती कथक नृत्यालयातर्फे ही मैफल आयोजित करण्यात आली होती. कॅरोलिन जर्मनीतील म्युनिच शहरात ‘धन्य कथक नृत्यालय’ संचालित करतात. युरोपात त्यांच्या कलेला नावाजले जातेच पण कथक मधील जाणकार भारतीय प्रेक्षकांसमोर त्यांच्या नृत्याविष्कारास दाद मिळावी, या हेतूने या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते.

  • अर्पिता वैशंपायन यांनी स्वरसाथ दिली आणि अजय पराड (संवादिनी) तर आदित्य देशमुख यांनी तबला साथ केली. नीलिमा अध्ये यांनी पढंत सादर केले. बिलासखानी तोडी रागातील सरगम ( ताल रूपक ), तराणा (झप ताल), गीत (अद्ध), नटवरी (एक ताल) पेश करण्यात आला. रसिकांची त्याला विशेष दाद मिळाली.

‘सिंधुरवदना मदनसम सुंदर’ या गणेशस्तुतीने मैफलीची सांगता करण्यात आली. या रचनेचे काव्य, संगीत आणि नृत्य गुरु रोहिणी भाटे यांचे होते. गणेशाच्या रूपाचे आणि नृत्याचे वर्णन करणारी ही नृत्यरचना सादर करताना कॅरोलिन यांनी वठवलेले बारकावे स्तुत्य होते. त्यांचे लालित्य आणि पदन्यास दोन्ही कौतुकास पात्र होते. पाश्चात्य नृत्यांगनाचे ‘कथक’ सादरीकरण या कौतुकापोटी नव्हे तर त्यांच्या शैलीच्या विशुद्ध नृत्याकरिता कॅरोलिन यांनी रसिकांची वाहवा मिळवली.

  • पहाटे तीनला ‘कथक’ साधना !
    जर्मन कथक नृत्यांगना कॅरोलिन डॅझेल यांचा मुलगा दोन वर्षांचा असताना कथक शिकण्यासाठी त्या पुण्यात नीलिमा अध्ये त्यांच्याकडे आल्या होत्या. मात्र, त्यांच्या मुलामुळे त्यांना नृत्यसाधनेत अडथळे येत होते. त्यावर नीलिमाताईंनी तोडगा काढला. पहाटे तीन ते सहा अशी कथक तालीम त्यांनी कॅरोलिन यांच्याकडून करून घेतली. नीलिमाताईंचे ॠण व्यक्त करताना याचा आवर्जून उल्लेख त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केला. भारतीय कथक कलाकार, जाणकारांसमोर ध्वनिफितीऐवजी प्रत्यक्ष साथसंगतकारांसमवेत कला सादर करून त्यांची दाद मिळाल्याने विशेष आनंद वाटल्याचे कॅरोलिन यांनी आवर्जून सांगितले.
HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3