Pune : भामा-आसखेड योजनेचा तिढा अखेर सुटणार !

एमपीसी न्यूज- आमा-आसखेड योजनेचा तिढा अखेर सुटण्याची शक्यता आहे. प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन येत्या काही दिवसांतच करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, ग्रामस्थांनी काम सुरू करण्यास हिरवा कंदील दिला असल्यामुळे आजपासून प्रकल्पाचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले आहे.

पुणे शहराच्या पूर्व भागाला हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पाणी मिळणार आहे. प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन पूर्ण झाले नसल्यामुळे ग्रामस्थांनी प्रकल्पाचे काम बंद पाडले होते. याविषयी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक झाली. बैठकीला महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे, आमदार शरद गोरे आणि ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

या बैठकीमध्ये 388 प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी जमीन देण्याची प्रक्रिया येत्या 20 दिवसांमध्ये सुरू करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर 20 ग्रामस्थांना रोख मोबदला देण्यात येणार आहे. येत्या 20 दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन आखण्यात आले आहे त्यामुळे ग्रामस्थांनी काम सुरू करण्यास हिरवा कंदील दिला आहे. या प्रकल्पामुळे पूर्व भागातील 14.5 लाख नागरिकांना पाणी मिळणार आहे. 2014 साली या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. जुलै 2017 मध्येच हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित होते. यानंतर अनेक वेळा प्रकल्पाचे काम बंद पाडण्यात आले होते. प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन योग्य पद्धतीने होत नसल्यामुळे काम बंद पाडण्यात आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.