Pune : भरतनाट्यम्‌‍ नृत्य सादरीकरणातून घडले गुरू-शिष्य परंपरेचे दर्शन

ऋत्विक फाउंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्ट्स आयोजित ‘परंपरा' मालिकेचे गुंफले पहिले पुष्प

एमपीसी न्यूज : मंगलपदेपंचजाती अलारिपुवर्णम्‌‍ अशा (Pune) भरतनाट्यम्‌‍ नृत्यशैलीतील विविध रचनांद्वारे भरतनाट्यम्‌‍ नृत्यगुरूनृत्यदिग्दर्शिका स्मिता महाजन आणि त्यांच्या शिष्या भरतनाट्यम्‌‍ संगीताचार्य अलका लाजमी यांनी प्रभावी सादरीकरणाद्वारे रसिकांना मोहित केले.

कलेच्या क्षेत्रातील गुरू-शिष्य परंपरेचा वारसा रसिकांना समजावा, गुरू-शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित व्हावे या उद्देशाने ऋत्विक फाउंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्ट्सतर्फे ‘परंपरा’ ही मालिका सुरू करण्यात आली असून मालिकेतील पहिले पुष्प रविवारी (दि. 7) गुंफण्यात आले. कार्यक्रम ऋत्विक फाउंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्ट्स, कोथरूड येथे झाला. कलाकारांना डॉ. पल्लवी नाईक (नट्टूवांगम), विद्वान पी.के.एस. कृष्णमूर्ती (गायन), यशवंत हम्पीहोळी (मृदंगम्‌‍) आणि संयज शशीधरन (बासरी) यांनी साथसंगत केली.

1600 ते 1900 या शतकात दक्षिण भारतातील तंजावर प्रांतात अधिराज्य गाजविणाऱ्या भोसले घराण्याने विविध कलाप्रांतातील कलाकारांना केवळ प्रोत्साहित केले नाही तर अनेक संगीत रचना, नृत्य-नाट्याची निर्मितीही केली आहे. भोसले घराण्यातील शहाजीराजे भोसले यांनी रचलेल्या काही रचनाही (Pune) कार्यक्रमात सादर करण्यात आल्या. तंजावर घराण्यातील कला परंपरेचा सखोल अभ्यास पार्वतीकुमार, किट्टपा पिल्लाई, सुचेता भिडे-चापेकर या नृत्यगुरूंनी करून ही परंपरा आपल्या शिष्यांकडे प्रवाहित केली आहे.

Jayant Patil : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस

गणेशवंदने नंतर स्मिता महाजन आणि अलका लाजमी यांनी तंजावरचे शहाजीराजे भोसले यांनी रचलेल्या ‘श्री त्यागेशाय मंगलम्‌‍’ या रचनेने कार्यक्रमाची सुरुवात केली. तंजावर घराण्याचा अभ्यास करताना अभ्यासकांना काही मराठी रचना गवसल्या. त्यातील ‘पाहिले कृष्णा’ या शब्दांवर आधारित आनंदभैरवी रागातील ‘पाहिले कृष्णा आनंद मुरारी हरि यमुना तिरी दैत्य संहारी’ या रचनेवर स्मिता महाजन यांनी नृत्यप्रस्तुती केली. (Pune) नृत्य आणि अभिनयाचा मिलाफ असलेल्या वर्णम्‌‍ या नृत्यप्रकाराद्वारे नायकाने वचन मोडलेल्या नायिकेचा तिच्या सखीशी असलेला संवाद ‘सखीये सजणी मजसी तारी’ या रचनेतून आणि काफी रागातील ‘सखी मी सांगू कशी’ या रचनेद्वारे नायक आणि नायिकेतील शब्दाविण घडत असलेला अनुराग अलका लाजमी यांनी प्रभावीपणे सादर केला.

भरतनाट्यम्‌‍ नृत्य प्रकारातील विविध भावना दर्शविणाऱ्या अष्ट नायिकांपैकी ‘सखी यात माझा अन्याय काय?’ या रचनेतून ‘खंडिता’ म्हणजेच दुर्लक्षित असलेल्या नायिकेचे दर्शन घडले. कल्याणी रागातील ‘रागवू कशी तुला लाडके’ या रचनेतून आई आणि मुलीतील वात्सल्य भाव प्रदर्शित झाला. (Pune) स्मिता महाजन आणि अलका लाजमी यांनी ‘जक्किणी दरु’ सादर करून कार्यक्रमाची सांगता ‘मंगल मंगल होऊ दे’ या प्रार्थनेने केली.

सुरुवातीस कलाकारांचा सत्कार ऋत्विक फाउंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्ट्सचे प्रमुख प्रवीण कडले आणि चेतना कडले यांनी केला. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन अमृता धारप यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.