Pune : श्रीनाथ भिमाले, सुनील कांबळे , सिद्धार्थ शिरोळे यांना आपल्या पदाचा राजीनामा देण्याचे आदेश

एमपीसी न्यूज – नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला हडपसर आणि वडगावशेरी मतदारसंघांत दारूण पराभवाला सामोरे जावे लागले होते. पक्षपातळीवर त्याची गंभीर दखल घेण्यात आली. राज्यात गुरुवारी काँगेस – राष्ट्रवादी – शिवसेना महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत असतानाच श्रीनाथ भिमाले यांना पुणे महापालिकेच्या सभागृहनेतेपदाचा, सुनील कांबळे यांना स्थायी समिती अध्यक्षपदाचा तर, सिद्धार्थ शिरोळे यांना पीएमपीएलच्या संचालकपदाचा तडकाफडकी राजीनामा देण्याचे आदेश भाजपने दिले आहेत.

स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे आता आमदार झाले आहेत. त्यांचा स्थायी समिती अध्यक्षपदाचा कालावधी मार्च 2020 पर्यंत होता. मात्र, त्यापूर्वीच कांबळे यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सभागृह नेतेपदासाठी धीरज घाटे यांचे नाव सर्वाधिक आघाडीवर आहे. नगरसेवक दीपक पोटे, सुशील मेंगडे, नगरसेविका मंजुश्री नागपुरे, आरती कोंढरे यांचाही या पदासाठी विचार केला जाऊ शकतो. स्थायी समिती अध्यक्ष आणि ‘पीएमपीएमएल’ संचालक पदावर कोणाला संधी मिळणार, याची उत्सुकता लागली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.