Pune: मोठी बातमी! कोरोना ‘हॉटस्पॉट’मधील 71 हजार कुटुंबांच्या स्थलांतराच्या प्रक्रियेस सुरूवात

साडेतीन लाख नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवणार

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील मध्यवर्ती भाग हा कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ झाला आहे. या परिसरातील सुमारे 71 हजार कुटुंबांचे तात्पुरते स्थलांतर करण्याची प्रक्रिया पुणे महापालिकेने सुरू केली आहे. कोरोनाचे संकट आटोक्यात आणण्यासाठी या नागरिकांना पुणे महापालिकेच्या शाळा, वसतिगृहे, मंगलकार्यालयांमध्ये ठेवण्यात येणार आहे. या नागरिकांच्या जेवणाची, राहण्याची व्यवस्था करण्यात येणार असून, सुमारे साडेतीन लाख नागरिकांना हलविण्यात येणार आहे, महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली.

भवानी पेठ, कसबा – विश्रामबागवाडा, ढोले पाटील रोड, शिवाजीनगर – घोलेरोड, येरवडा या भागांत रोज कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढतेच आहे. 1300 च्या वर कोरोनाचे रुग्ण गेले आहेत. तर, 80 नागरिकांचा या रोगामुळे बळी गेला आहे.

कोरोना संसर्ग थांबविण्यासाठी कठोर निर्णय – महापौर मुरलीधर मोहोळ

दाट लोकवस्तीमध्ये अनेकांची घरे 100 चौरस फुटांची आहेत. त्या कुटुंबांत 4 ते 5 जण असतात. त्यामुळे त्या ठिकाणी ‘सोशल डिस्टनसिंग’चे पालन होत नाही. त्यामुळे या भागांत मोठ्या प्रमाणात कोरोना फैलावत आहे. हे संकट कमी करण्यासाठी या भागातील नागरिकांना महापालिकेच्या शाळा, मंगल कार्यालयात, वसतिगृहात हलविण्यात येणार आहे. स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून जेवण देण्यात येणार असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. काही कुटुंबांना ‘एसआरए’च्या इमारतींमध्येही हलविण्यात येणार आहे.

अत्यावश्यक सेवांसाठी आता सकाळी १० ते दुपारी २ वेळ !

दरम्यान, अत्यावश्यक सेवेसाठी आता सकाळी १० ते दुपारी २ अशी वेळ वाढण्यात आली असून याची अंमलबजावणी उद्यापासून होणार आहे. या संदर्भात पुणे पोलिसांशी कालच चर्चा झाली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.