Pune : कचरा वेचक असल्याचे भासवून तो चोरायचा दुचाकी, संशयावरून ताब्यात घेतले अन ठोकल्या बेड्या

एमपीसी न्यूज- ज्या परिसरात सीसीटीव्ही नाही, अथवा जास्त गर्दी नाही असा परिसर हेरून त्यानंतर कचरा वेचक असल्याचे भासवून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला हडपसर पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

पिल्ला उर्फ रोहित प्रवीण पवार (वय 20, रा. गंगा नगर, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर अन्य एक आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला कुटुंबियांच्या ताब्यात सोपवले आहे. पिल्लाच्या ताब्यातून पोलिसांनी चोरलेली एक चारचाकी, सात दुचाकी, पाच मोबाईल असा एकूण साडेसात लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

हडपसर पोलीस स्टेशनचे कर्मचारी हडपसर परिसरात गस्त घालत असताना त्यांना मंत्री मार्केट येथे दोघेजण चोरीची दुचाकी घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी संशयास्पदरित्या फिरणाऱ्या दोघांना ताब्यात घेऊन गाडीच्या कागदपत्रांची विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी चोरीची गाडी असल्याचे कबूल केले.

पोलिसांनी केलेल्या अधिक चौकशीत आरोपीने कश्याप्रकारे चोरी करत होता ते सांगितले. आरोपी पहाटे 3 ते 5 वाजण्याच्या सुमारास ज्या परिसरात सीसीटीव्ही नाही, अथवा जास्त गर्दी नाही असा परिसर हेरायचा. त्यानंतर कचरा वेचक असल्याचे भासवून तो त्या परिसरातील दुचाकी आणि मोबाईल फोन चोरायचा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.