Pune : पुणे धर्मप्रांताचे निवृत्त बिशप व्हॅलेरियन डिसोझा यांचे निधन

एमपीसी न्यूज- पुणे धर्मप्रांताच्या इतिहासात तब्बल 31 वर्षे बिशपपद भूषविणारे निवृत्त बिशप व्हॅलेरियन डिसोझा (वय 88) यांचे मंगळवारी रात्री साडेअकरा वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. बिशप डिसोझा यांनी शेकडो मोठी प्रवचने देऊन भक्तांना प्रभू येशूचा मार्ग दाखविला.

बिशप व्हॅलेरियन डिसोझा यांचा जन्म पुण्यात 3ऑक्टोबर 1933 रोजी झाला. त्यांचे शालेय शिक्षण पुण्यातील सेंट व्हिन्सेंट स्कूलमध्ये झाले. तब्बल 31 वर्षे त्यांनी पुणे धर्मप्रांताचे बिशपपद भूषवले. त्याच्या कार्यकाळातच पुणे धर्मप्रांताचे नाशिक आणि सिंधुदुर्ग धर्मप्रांतामध्ये विभागणी झाली. उत्तम प्रशासक, अमोघ वक्तृत आणि प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून बिशप डिसोझा यांची ओळख होती. प्रवचन देताना स्वतःच गिटार वाजवीत गाणी म्हणण्याची सवय असल्याने त्यांना “सिंगिंग बिशप’ म्हणून ओळखले जात असे.

वयाच्या 79 व्या वर्षी त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून प्रवचने देण्यास सुरवात केली. त्यांच्या उपक्रमाला अल्पावधीतच चांगलाच प्रतिसाद मिळाला. या माध्यमातून जगभरातून सुमारे अठराशे मित्र जोडले गेले. प्रवचन पोस्ट करण्याबरोबरच परिचितांना लग्न आणि वाढदिवसाच्या शुभेच्छाही ते नियमित पाठवीत असत.

पुणे धर्मप्रांताचे बिशप असताना डिसोझा यांना देशात आणि युरोपात अनेक ठिकाणी धार्मिक प्रवचन देण्यासाठी मोठी मागणी असे. त्यांच्या प्रवचनांचे तीन खंड प्रसिद्ध झाले असून गुड फ्रायडे आणि ईस्टरदरम्यान एका स्थानिक केबल नेटवर्कच्या माध्यमातून त्यांच्या प्रवचनांचे प्रक्षेपण अगदी अलीकडील काळापर्यंत करण्यात येत होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.