-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pune News : पुणे भाजपही जपतोय प्रॉपर्टी विकण्याचा मोदींचा वारसा 

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा आरोप

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज : : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्याप्रमाणे देशातील अनेक कंपन्या विकायला काढल्या आहेत, त्याचीच पुनरावृत्ती करीत, पंतप्रधानांचाच वारसा जपत महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपने पुणे महानगरपालिकेच्या अनेक प्रॉपर्टी विकण्याचा सपाटा लावला आहे. असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी  पत्रकार परिषदे मध्ये केला. 

 जगताप म्हणाले , २०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्यासाठी म्हणून महानगरपालिकेच्या मालकीच्या १२६० फ्लॅट विक्रीचा निर्णय घेण्यात आला आहे. अमेनिटी स्पेस भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्ताव हा त्यातीलच एक भाग आहे. फ्लॅट विक्रीचा जो निर्णय घेण्यात आला आहे, तो केवळ २०० कोटी रुपयांचा नाही.

तर, या फ्लॅटची किंमत सुमारे २२०० कोटींच्या घरात आहे. हे फ्लॅट ज्या भागात आहेत, ज्या स्कीममधील आहेत, त्याची यादी पाहिल्यास आपल्याला ते लक्षात येईल. त्यामुळे, गरिबांना फ्लॅट देण्याच्या आडून सत्ताधारी भाजपचा हा सुमारे दोन हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा प्रयत्न आहे.

पुणेकरांची फसवणूक करण्याचा भाजपचा हा प्रयत्न हाणून पाडल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस गप्प बसणार नाही. रस्ता रुंदीकरणामध्ये बाधित होणाऱ्या कुटुंबांना भाडेतत्त्वावर देण्यात आलेले महानगरपालिकेच्या मालकीचे फ्लॅट त्यांनाच विकण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे.

पहिल्या टप्प्यात १२६० आणि दुसऱ्या टप्प्यात ७२४ अशा १९८४ फ्लॅटची विक्री करण्यात येणार आहे. हा निर्णय घेतला जात असताना विरोधी पक्षांच्या सदस्यांना विश्वासात घेतले गेले नाही. घाईगडबडीत हा निर्णय घेतला गेला. यामागे मोठा भ्रष्टाचार असून, गोरगरीबांचे नाव पुढे करून स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने व सभागृह नेते गणेश बीडकर हे एकप्रकारे इस्टेट एजंट असल्याप्रमाणेच काम करीत असे जगताप म्हणाले.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

तर, कोथरूडचे आमदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांच्या मर्जीनेच हा कारभार सुरू असल्याची शक्यता आहे. पुणेकरांच्या प्रॉपर्टीवर घाला घालण्याचा हा प्रकार असून, हा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस हाणून पडणार असल्याचे  जगताप यांनी सांगितले.

मुळात, हे फ्लॅट नावावर करून द्यावे, अशी एकानेही मागणी केली नाही.

जे लाभार्थी आहेत, गरीब आहेत, त्यांना फ्लॅट मिळावे, या मताचेच आम्ही आहोत. परंतु, गरीबांचे नाव पुढे करून भाजपच्या मर्जीतील लँड माफियांचा फायदा करण्याचा उद्योग पालिकेतील सत्ताधारी करीत आहेत. त्यासाठी गरिबांना घरे मिळतील, अनेक भाडेकरू जागेवर कब्जा करतील, अशी न पटणारी कारणे दिली जात आहेत.

अनेकांची बनावट कागदपत्रे बनवून त्यांच्या घशात फ्लॅट घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा जवळपास दोन हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा प्रयत्न आहे. आम्ही याबाबत नगरविकास खाते, गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडेही तक्रार करणार आहोत.

पालिकेवर इतकी वाईट वेळ आली नाही

पुणे महानगरपालिकेच्या सुमारे २२०० कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी काटकसर करून या ठेवी जमा केल्या आहेत. महानगरपालिकेची आर्थिक स्थिती पाहता, पालिकेच्या मालकीच्या प्रॉपर्टी विकून विकासकामे करावेत, इतकी वाईट वेळ पालिकेवर आली नाही. जर गरज पडलीच, तर या ठेवींतून किंवा ठेवींवर कर्ज घेऊन विकासकामे करण्यास आम्ही पाठिंबा देऊ. मात्र, बापाने कमवायचे आणि पोराने गमवायचे, याप्रकारे पालिकेच्या प्रॉपर्टींची विक्री करण्यास आमचा विरोध आहे असे जगताप यांनी स्पष्ट केले.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.