Pune: भाजप शहाराध्यक्षांचे आरोप बिनबुडाचे – सुभाष जगताप

Pune: BJP city president's allegations are baseless - Subhash Jagtap

एमपीसी न्यूज –  फक्त 323 च रस्तेच का,  शहरातील सर्वच 6 मीटरचे रस्ते 9 मीटर करून रस्त्यांबाबत पुणेकरांच्या हिताचे निर्णय घ्या, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितल्याने भाजपला ‘मिरच्या झोंबल्या’ आहेत. त्यामुळे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक ‘दादां’वर दादागिरी केली म्हणून बिनबुडाचे आरोप करीत आहेत, आशा शब्दांत राष्ट्रवादीचे स्वीकृत नगरसेवक सुभाष जगताप यांनी हल्लाबोल केला. पुणेकर सुज्ञ आहेत. मुळीक यांचा डोळा कोणत्या मालिद्यावर आहे, हे त्यांना चांगलंच माहीत आहे, असा शेराही त्यांनी मारला.
भाजपचे तत्कालीन पालकमंत्री सर्वच बाबतीत अपयशी ठरल्यानंतर अजित पवार यांनी पालकमंत्री म्हणून शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी भामा – आसखेडचा निर्णय धडाडीने घेतल्याची सल मुळीक यांना कुठेतरी बोचत आहे, असे त्यांच्या गोंधळलेल्या अवस्थेवरून दिसून येत आहे. भाजपने बहुमताच्या जोरावर शहरातील नागरिक, विरोधी पक्षांचे लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि स्वयंसेवी संस्था यांना विश्वासात न घेता चुकीचे निर्णय घेतले आहेत, असा आरोप जगताप यांनी केला आहे.

शहरातील 6 मीटरचे 323 रस्ते 9 मीटरचे करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. मात्र, शहरात प्रचंड मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या वाहतूक कोंडीचा विचार करून अजित पवार यांनी फक्त 323 च रस्ते नको तर शहरातील सर्वच 6 मीटरचे रस्ते 9 मीटर करावेत, असे महापालिकेला सांगितले. पुणे शहराचा पुनर्वलोकन विकास आराखडा महानगरपालिकेची मुदत संपली नसताना तत्कालीन भाजपच्या राज्य सरकारने हुकूमशाही पध्दतीने काढून स्वतःच्या ताब्यात घेतला. हे जगदीश मुळीक विसरले का, असा सवालही सुभाष जगताप यांनी उपस्थित केला आहे.
डीपीमध्ये 300 हून अधिक मोकळ्या जागा बिल्डरांच्या घशात घातल्या आहेत. या जागा म्हणजे पुणेकरांना मोकळा श्वास घेता यावा, हॉस्पिटल्स, गार्डन, शाळा, आदींच्या या सार्वजनिक सुविधांच्या जागा होत्या. त्यामध्ये शहर भाजपच्या मंडळींनी काय काय गोष्टी केल्या आहेत, ते संपूर्ण शहराला माहीत झाल्या आहेत. पुणेकरांनी भाजपला स्पष्ट बहुमत देऊन जनादेश दिला खरा, मात्र गेल्या साडेतीन वर्षांत भाजपने पुणेकरांचा पूर्णपणे भ्रमनिरास केला आहे. भाजपचा खरा चेहरा उघड झाला आहे. त्यामुळे पुणेकर भाजपला जागा दाखविल्या शिवाय राहणार नाहीत, असा इशाराही जगताप यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.