Pune : भाजपच्या नगरसेविका किरण जठार यांचे पद रद्द

एमपीसी न्यूज- बनावट कागदपत्रांच्या आधारे जात प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी पुणे महापालिकेतील भाजपच्या नगरसेविका किरण जठार यांचे पद बुधवारी (दि. 30) रद्द करण्यात आले. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

ही माहिती राज्य निवडणूक आयोगाला देण्याची कार्यवाही पालिकेकडून सुरू करण्यात आली. पालिकेच्या निवडणुकीत किरण जठार यांनी भाजपच्या चिन्हावर कळस-धानोरी प्रभाग क्रमांक एक मधील अ गटातील अनुसूचित जाती या प्रवर्गातून निवडणूक लढविली होती. त्यामध्ये त्या विजयी झाल्या होत्या.

उमेदवारी अर्ज भरताना किरण जठार यांनी उपजिल्हाधिकारी भूसंपादन कार्यालयाकडून जातीचा दाखला प्राप्त केला होता. मात्र त्यावर आक्षेप घेत हुलगेश चलवादी, दिलीप ओरपे आणि रेणुका चलवादी यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन जठार यांनी जातीचा दाखला प्राप्त केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची कारवाई करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.