Pune : केंद्राला मदत करून भाजप नगरसेवकांनी पुणेकरांसोबत प्रतारणा केली : चेतन तुपे पाटील

एमपीसी न्यूज – भाजप नगरसेवकांनी आपले मानधन पंतप्रधान निधीला दिल्याचा राष्ट्रवादीतर्फे निषेध करण्यात आला. केंद्राला मदत करून भाजप नगरसेवकांनी पुणेकरांसोबत प्रतारणा केल्याची टीका राष्ट्रवादीचे शहाराध्यक्ष आणि आमदार चेतन विठ्ठल तुपे पाटील यांनी केली आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटकाळातही पुणे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे.

याबाबत तुपे पाटील म्हणाले, एकीकडे पुण्याचे आयुक्त सीएसआर फंडातून मदत मिळविण्यासाठी आवाहन करत आहेत. अशा परिस्थितीत पुणेकरांचे कष्टाचे घामाचे टॅक्स रुपी पैसे पुणेकरांसाठी न वापरता इतरत्र वापरणे योग्य नाही. आम्ही सातत्याने कोरोनामध्ये राजकारण नको, आपण सर्वांनी मिळून या संकटाचा सामना केला पाहिजे, अशी भूमिका मांडत आलो आहोत. परंतु, भाजपाने महाराष्ट्रात मात्र सातत्याने या प्रश्नावर गलिच्छ राजकारण सुरू ठेवलेले आहे.

पुण्यात तर निंदनीय राजकारणाचा कळस पाहण्यात आला आहे. आम्ही सातत्याने नगरसेवकांच्या निधीतून पुणेकरांसाठी औषधे, मास्क, अन्न, स्वच्छतेची उपकरणे खरेदी करावीत, ही मागणी करत आलोय. मात्र, याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून सत्ताधारी भाजप पुणेकरांच्या सहनशीलतेचा अंत पाहत आहेत.

पंतप्रधान निधीला पैसे देण्यापेक्षा हे पैसे पुणेकरांच्या हितासाठी वापरले असते तर जास्त योग्य झाले असते. केंद्राला पैसे देऊन आपल्याला ज्या पुणेकरांनी निवडून दिलं, ज्यांनी पुण्याची सत्ता दिली, त्या पुणेकरांशी भाजप नगरसेवकांनी प्रतारणा केली, त्यांच्यावर अन्याय केला आहे, असा घणाघात तुपे पाटील यांनी केला आहे.

केंद्र सरकार आपल्याकडून पैसे घेते. परंतु, केंद्राची वागणूक महाराष्ट्राच्या बाबतीत सापत्नपणाची आहे, हे उघडउघड दिसून येतंय. केंद्र सरकार मदत करताना महाराष्ट्राशी दूजाभाव करत आहे. हे सर्वसामान्य माणसांना कळून चुकलंय, अशा परिस्थितीत हे पैसे आपल्या पुणेकर जनतेसाठी वापरणं हे सत्ताधारी भाजपचं काम होतं.

अत्यंत खालच्या पातळीचे राजकारण करायची सवय लागल्यामुळे त्यांनी असं कृत्य केलेला आहे, त्याचा मी तीव्र शब्दात धिक्कार करतो, अशा शब्दांत तुपेपाटील यांनी भाजपचा निषेध केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.